मुंबई: पोलीस दलात असताना अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रामसिंग डोलगे (५९) याला अखेर बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. डोलगे मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. तो २०२३ मध्ये निवृत्त झाला होता. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याला पोलीस दलात नोकरी लावण्याच्या नावाखाली त्याने ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.

पालघर येथे राहणारे तक्रारदार वैभव तरे (३४) महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहेत. त्यांची भेट २०२१ मध्ये तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) रामसिंग डोलगे (५९) याच्याशी झाली होती. डोलगे याने तरे याला मुंबई पोलीस दलात नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. या कामासाठी सुमारे ७ लाख रुपये घेतले होते. मात्र तरे याला पोलीस दलात नोकरी लावली नाही. काम न झाल्याने तरे याने पैसे परत मागितले होते. मात्र डोलगे याने टाळाटाळ केली. नंतर डोलगे याने जे धनादेश दिले ते देखील वटले नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री तरे यांना पटली आणि त्यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात डोलगे विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये डोलगे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४),३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

हा फसवणुकीचा गुन्हा असल्याने आरोपीला तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र हजर तो झाला नव्हता तसेच तपासाला देखील सहकार्य करत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परिमंडळ ११ च्या पोलीस उपायुक्तांकडून अटकेची परवानगी मिळवली होती. त्यानंतर शुक्रवारी डोलगे याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता १६ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी डोलगे याच्या विरोधात मीरा रोड, कस्तुरबा मार्ग आणि मेघवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची अधिक चौकशी सुरू आहे. याप्रकरणात अन्य कुणाचा सहभाग आहे का त्याचाही आम्ही तपास करत आहोत, असे बोरिवली पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस असल्याचा फायदा उठवत तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामसिंग डोलगे याने लोकांची आर्थिक फसवणूक केली होती. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा समाजात मलीन झाली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.