राज्य सरकारचा अजब कारभार; समन्वयाचा अभाव अंगलट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री आणि त्या मंत्र्यांचे विभाग यातील समन्वयाचा अभाव कोणत्या पातळीवर उतरला आहे याचे एक अफलातून उदाहरण समोर आले आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदांवर वर्णी लावून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या नादात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे चक्क तीन पदांचा कार्यभार सोपविण्याचा प्रताप सरकारने केला आहे.

आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय सतबीर सिंह वयोमानानुसार जुलैअखेर सेवानिवृत्त होणार होते. मात्र, निवृत्तीपूर्वीच त्यांची महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणावर (महारेरा) सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानुसार सिंह यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत ‘महारेरा’चे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला. हे सर्वश्रुत असताना अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यांचीच राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगावर गैरन्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांची ही नियुक्ती पाच वर्षे किंवा वयाच्या ६७व्या वर्षांपर्यत असेल असेही विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

हे कमी की काय, म्हणून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणावरही (मॅट) सदस्य म्हणून त्याची निवड करण्यात आली असून, त्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.  एखाद्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची एकाच वेळी तीन पदांवर निवड होण्याची ही राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील पहिलीच घटना मानली जाते.

तीन ठिकाणी निवड होणे हे माझे भाग्य आहे. मात्र, मी केवळ ‘महारेरा’वर कार्यरत राहणार आहे.

 – विजय सतबीर सिंह, निवृत्त अधिकारी