संदीप आचार्य

राज्यात ७३.१७ टक्के रुग्ण बरे झाल्याची अधिकृत माहिती असली तरी, प्रत्यक्षात एक लाख आठ हजार करोनामुक्त रुग्णांची नोंद भारतीय वैद्यक संशोधन केंद्राच्या (आयसीएमआर) संकेतस्थळावर झाली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जवळपास एक लाखाहून अधिक बरे झालेल्या रुग्णांची नोंद वेगवेगळ्या रुग्णालयांनी ‘करोना १९ पोर्टल’वर केलेली नाही. यासाठी ९ ते १९ सप्टेंबर या काळात दाखल झालेल्या रुग्णांचा तपशील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागवला. या काळात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेण्यात आली. सामान्यपणे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू न झाल्यास दहाव्या दिवशी रुग्ण बरा होऊन घरी जात असतो. काही ज्येष्ठ रुग्णांना १४ दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी राहावे लागत असले तरी बहुतेक रुग्ण बरे होऊन दहाव्या दिवशी घरी जातात.

९ ते १९ सप्टेंबर या काळात दाखल झालेले रुग्ण, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण आणि पोर्टलवरील नोंद असलेल्या रुग्णांच्या आकडेवारीत तफावत असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथे रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे उपचारात गुंतलेल्या अनेक रुग्णालयांनी बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांचा तपशील पोर्टलवर नोंदवला नसल्याचे दिसून आले.

मृत्यू नोंदीतील तफावतीमुळे टीका

* यापूर्वी अनेक रुग्णालयांनी करोना मृत्यूंची नोंद न केल्यामुळे करोना मृत्यू लपवल्याची टीका विरोधकांनी केली होती. प्रामुख्याने हे मृत्यू मुंबई महापालिकेच्या  रुग्णालयांत झाले होते.

* करोनामुक्तांची नोंद न झाल्याची बाब लक्षात न आल्याने राज्यात बाधितांचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नोंद न झालेल्या एक लाख आठ हजार करोनामुक्तांची भर पडल्यानंतर बरे झालेल्यांची संख्या वाढेल.