मुंबई: नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात तुकडाबंदी असतानाही संगमेश्वर-गुळगाव येथील भूखंड अदलाबदल प्रकरणात तत्कालिन मालेगाव प्रांताधिकावर निलंबनाची कारवाई करतानाच सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, उपविभागीय अधिकारी, मालेगाव यांच्या निर्णयास अनुसरून अपर जिल्हाधिकारी, मालेगाव यांनी शेत जमीन अदलाबदल संदर्भातील आदेश व त्या आदेशान्वये घेण्यात आलेला फेरफार रद्द केला आहे. चुकीच्या कार्यवाहीबाबत संबंधित उप विभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात येत असून एक महिन्यात विभागीय चौकशी केली जाईल,असे बावनकुळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जमीन अदलाबदल प्रकरणात तुकडे बंदी कायदा, महाराष्ट्र नगररचना अधिनियम (एमआरटीपी) कायद्याचे उल्लंघन झाले असून सन २०१३ ते २०१९ या कालावधीत २५८ दस्त नोंदणी झाले आहेत. या अनधिकृत दस्त नोंदणीमध्ये या कालावधीत त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या आठ अधिकाऱ्यांची व दोन मुद्रांक विक्रेत्यांची चौकशी केली जाईल. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार फौजदारी कारवाई केली जाईल असेही बावनकुळे यांनी सांगितले.