मुंबई : वाहन अपघातांत जखमी होणाऱ्या तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, तसेच वाहन प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षणाचा ढासळलेला दर्जा आणि होणाऱ्या गैरप्रकारांमुळे परिवहन विभागाकडून राज्यातील वाहन प्रशिक्षण केंद्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून तसे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना देण्यात आले आहेत. ही मोहीम ३१ मेपर्यंत सुरू राहिल. यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वाहन प्रशिक्षण केंद्रांना परवाना देताना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा, प्रशिक्षक, प्रशिक्षण वाहने, शिकवण्याचा अभ्यासक्रम, ठेवावयाच्या नोंदी इत्यादी बाबींच्या तरतुदी मोटर वाहन कायद्यात आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण संस्थांचे निरीक्षण नियमित, वस्तुनिष्ठ होण्यासाठी २००३ पासून वेळोवेळी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सूचनाही दिल्या आहेत. निरीक्षण झाल्यानंतरही पुन्हा प्रशिक्षण केंद्राकडून नियमांकडे दुर्लक्षच केले जाते आणि त्यामुळे प्रशिक्षित वाहन चालक येत नाहीत. शिवाय अपघातांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा न सुधारणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नियमांची पूर्तता न करणाऱ्या केंद्रांवर परिस्थितीनुरुप कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यांना सुधारण्याची संधी किंवा निलंबन तसेच त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा इशारा दिला आहे.