मुंबई : विधिमंडळातील शिवसेनेचे १०-१५ आमदार सोडले तरी बाकी सर्व आमच्याबरोबर असल्याने आम्हीच विधिमंडळ शिवसेना पक्षात आहोत. खासदार संजय राऊत यांच्या सल्ल्यामुळे संपूर्ण शिवसेनाच राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचे काम झाले. मग शिवसेनेचे अस्तित्व काय उरेल. त्यामुळेच आम्ही बंड केलेले नाही तर हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि आता जिंकल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून आमदार दीपक केसरकर यांनी पत्राद्वारे मांडली.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे अशी मागणीही केसरकर यांनी नंतर माध्यमांशी बोलताना केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेना बैठका घेऊन शिंदे गटाला  निवडणुकीत पराभूत करून धडा शिकवण्याचा निर्धार शिवसेना नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातर्फे दीपक केसरकर यांनी पत्र लिहून आपल्या कृतीमागील भूमिका स्पष्ट केली.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटण्यासाठी एकप्रकारे आदित्य ठाकरे यांच्या १५१ जागांचे उद्दिष्ट या घोषणेवरही ठपका ठेवला.  देशात मोदी सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री असतानाही संजय राऊत यांनी अत्यंत विखारी भाषेत भाजप व मोदी सरकारवर टीका सुरू केली आणि शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण व्हायला सुरू झाली. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गळय़ातील ताईत आहेत. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी आमचा राज्यातील सर्व मतदारसंघात संघर्ष आहे त्याच पक्षांशी सलगी करून संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. आघाडीमध्ये शिवसेनाच मारली जाते हे आम्हाला मान्य नाही. आमचा लढा शिवसेनेचा व मराठी-हिंदु अस्मितेचा आहे. हे बंड नाही. हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही, असे दीपक केसरकर यांनी पत्रात म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट

हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याचे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केले.