मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबियांची चार बॅंक खाती गोठवण्याचे केंद्रीय अमली पदार्थ विभागाचे (एनसीबी) आदेश विशेष न्यायालयाने नुकतेच रद्द केले. एनसीबीने अनिवार्य कायदेशीर तरतुदीचे पालन न करता रिया आणि तिच्या कुटुंबीयांची बॅंक खाती गोठवल्याचे निरीक्षण देखील विशेष न्यायालयाने तिला दिलासा देताना नोंदवले.
खाती गोठवण्याच्या कारवाईसाठी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातंर्गत (एनडीपीएस) विहित मुदतीत सक्षम प्राधिकाऱ्याकडून एनसीबीने मंजुरी मिळवली नव्हती. परिणामी, बॅंक खात्यांवर लादलेली ही निर्बंधात्मक कारवाई कायदेशीरदृष्ट्या टिकणारी नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने आदेशात नोंदवले. मालमत्ता गोठवण्याच्या अधिकारावर कायदेशीर चौकटीने स्पष्ट मर्यादा घालून दिल्या आहेत. संबंधित प्रकरणात त्या कायदेशीर सुरक्षा उपायांचे पालन केले गेले नाही.
मालमत्ता गोठवण्याचा किंवा जप्त करण्याचा आदेश काढण्यात आल्यापासून ३० दिवसांत सक्षम प्राधिकरणाकडून पुष्टी मिळाल्याशिवाय तो लागू होत नाही, असेही विशेष एनडीपीएस न्यायालयाचे न्यायाधीश यू. सी. देशमुख यांनी रिया, तिचा भाऊ शौविक आणि आई संध्या यांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारताना स्पष्ट केले. तसेच, एनसीबीने गंभीर स्वरुपाची चूक केली असून रिया आणि तिचे कुटुंबीय दिलासा मिळण्यास पात्र असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले व त्यांची खाती गोठवण्याचे आदेश रद्द करून त्यांना ती रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार वापरण्यास परवानगीही दिली.
एनसीबीचा विरोध आरोपींच्या कथित विधानांचा आणि अमली पदार्थ तस्करीशी त्यांचा संबंध असल्याच्या आरोपांचा हवाला देताना सरकारी पक्षाने रिया आणि तिच्या कुटुंबीयांच्या बँक खाती वापरू देण्याच्या मागणीला विरोध केला होता. तसेच तस्करीच्या रकमेसाठी या खात्यांचा वापर केल्याचा आरोप करून खाती गोठवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. तथापि, निर्णय मर्यादित मुद्याशी संबंधित आरोपांच्या गुणवत्तेत आपण जाणार नसून सध्याचा आपला निर्णय हा केवळ खाती गोठवण्याच्या प्रक्रियेतील वैधानिक त्रुटीपुरता मर्यादित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, अनिवार्य आवश्यकतांचे पालन न करता खाती गोठवण्याची केलेली ही कारवाई बेकायका असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
प्रकरण काय ?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान, २०२० मध्ये ही खाती गोठवली गेली होती. या तपासात हत्येचा आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा पैलू समोर आला होता. याप्रकरणी रियाला अटकही झाली होती. तिला नंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर गेल्या वर्षी सीबीआयने आरोपांतून तिला दोषमुक्त केले होते.
