खासगी गाडय़ांमधून होणारी बेकायदेशीर वाहतूक, रिक्षा-टॅक्सी समन्वयक कंपन्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यात आलेले अपयश, मृत परवाने जीवित करताना रिक्षा चालकांना आकारलेले प्रचंड शुल्क यांविरोधात मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून १५ फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या दिवशी मुंबईतील ८३ हजार रिक्षा चालक रिक्षा बाजूला ठेवून वाहतूक विभागाच्या कार्यालयांवर मोर्चा काढणार आहेत. या मोच्र्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. मागण्या मान्य न झाल्यास पुढील कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल. राजरोसपणे अवैध वाहतूक सुरू असून त्यात खासगी वाहन चालकांचा सहभाग आहे.