मुंबई…आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर, आॅक्टोबर ते डिसेंबर २०२५ या तीन महिन्यांच्या काळात प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये १९ लाख ७० हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करत होते. आरे ते कफ परेड मेट्रो सुरु झाल्यानंतर आॅक्टोबर २०२५ मध्ये ३८ लाख ६३ हजार ७४१ प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर आक्टोबर ते डिसेंबर २०२५ या तीन महिन्यांच्या काळात मेट्रो ३ मार्गिकेवरुन एक कोटी २९ लाख ७८ हजार २६२ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे बांधकाम मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) करण्यात आले आहे. या मार्गिकेचे संचलन-देखभालीची जबाबदारीही एमएमआरसीवर आहे. मेट्रो ३ मार्गिकेचे काम तीन टप्प्यात करून एमएमआरसीने ही मार्गिका टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल केली आहे. आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये तर आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्पा आॅक्टोबर २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला.
पहिल्या टप्प्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. दिवसाला २० हजार प्रवासी या मार्गिकेवरुन प्रवास करत होते. दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवासी संख्या काहीशी वाढली. मात्र ही प्रवासी संख्या समाधानकारक नव्हती. त्यानंतर,ऑक्टोबर २०२५ मध्ये तिसरा आणि शेवटचा टप्पा सेवेत दाखल होऊन मेट्रो ३ मार्गिका आरे ते कफ परेड अशी पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर मात्र भुयारी मेट्रोकडे प्रवासी आकर्षित होऊ लागले.
सप्टेंबर २०२५ मध्ये, आरे ते आचार्य अत्रे चौक असा दुसरा टप्पा सेवेत दाखल असताना या मार्गिकेवरुन महिन्याभरात १९ लाख ७० हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. पण आॅक्टोबर २०२५ मध्ये ही संख्या दुप्पटीने वाढली. या महिन्यात प्रवासी संख्या ३८ लाख ६३ हजार ७४१ वर पोहचली. नोव्हेंबर २०२५ मध्ये ही संख्या ४४ लाख ५८ हजार ४३६ वर आणि आॅक्टोबरमध्ये ४६ लाख ५६ हजार ०८५ वर पोहचली.
प्रवासी संख्येत वाढ होत गेली आणि मेट्रो ३ पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर तीन महिन्यात या मार्गिकेवरुन प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या एक कोटी २९ लाख ७८ हजार २६२ वर गेली. प्रवासी संख्या वाढल्याने दैनंदिन प्रवासी संख्येतही वाढ झाली असून रोज ७५ हजार प्रवासी मेट्रो ३ वापरत होते. तेथे ऑक्टोबरमध्ये थेट एक लाख ८२ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या काहीशी कमी झाली असली तरी महिन्याभरातील एकूण प्रवासी संख्या वाढती रहिली. त्यामुळेच तीन महिन्यांच्या काळात सव्वा कोटींहून अधिक प्रवाशांनी या मार्गिकेवरुन प्रवास केला. नोव्हेंबरमध्ये १ लाख ३२ आणि डिसेंबरमध्ये १ लाख ४८ हजार अशी दैनंदिन प्रवासी संख्या होती. दरम्यान नवीन वर्षात एमएमआरसीने मेट्रोच्या फेऱयांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात या मार्गिकेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे एमएमआरसीचे लक्ष लागले आहे.
