वाटाणा १०० तर टोमॅटो ४० रुपये किलो!

एकीकडे कांद्याच्या चढय़ा दरामुळे सामान्यांना ठसका लागलेला असतानाच गेल्या आठवडय़ापासून उत्तम प्रतीचा टोमॅटोही भाव खाऊ लागला आहे.

एकीकडे कांद्याच्या चढय़ा दरामुळे सामान्यांना ठसका लागलेला असतानाच गेल्या आठवडय़ापासून उत्तम प्रतीचा टोमॅटोही भाव खाऊ लागला आहे. तर एरव्ही स्वस्त असलेला वाटाणाही किलोमागे १००च्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे जूनच्या अखेपर्यंत या दोन्ही भाज्यांचे भाव स्थिर होते. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवडय़ातच त्यांच्या घाऊक दरांत वाढ झाली आहे. निव्वळ आवक घटल्यामुळेच भाज्यांचे दर टोक गाठू लागले आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात घाऊक बाजारात २२ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ४० रुपयांना मिळत आहे. अवघ्या सात दिवसांत टोमॅटोने किलोमागे १८ रुपयांची उसळी घेतली आहे. कांदा-टोमॅटो महाग झाला असताना काकडीच्या दरानेही किलोमागे सात रुपयांची उंची गाठल्याने सामान्यांसाठी कोशिंबीर महाग ठरू लागली आहे. मुंबई-ठाणे परिसराला नाशिक जिल्ह्य़ातून भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. मात्र, वरुणराजा रुसल्यामुळे भाज्यांची ही आवक घटली आहे. त्याचा परिणाम भाज्यांचे दर वाढण्यात होऊ लागला आहे. असे असले तरी टोमॅटोच्या दरात झालेली वाढ आश्चर्यजनक आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात हाच टोमॅटो वाशीच्या घाऊक बाजारात आठ रुपये किलोने विकला जात होता.
 या भाववाढीमागे अपुरा पाऊस हेच कारण असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झालेल्या वाढीमागे कोणतेही गौडबंगाल नसून नारायणगाव व नाशिकमधून मुंबईला होणारी टोमॅटोची आवक निम्म्यावर आल्याचा हा परिणाम असल्याचे एपीएमसी बाजारातील तानाजी पाटील या टोमॅटो व्यापाऱ्याने सांगितले. सध्या बंगळुरूहून येणाऱ्या टोमॅटोवर मुंबईकरांना गुजराण करावी लागत असल्याचे अशोक चौरसिया या अन्य एका टोमॅटो व्यापाऱ्याने स्पष्ट केले.
आवक घटल्याने वाटाण्याच्या दरांनी दोन दिवसांपूर्वी शंभरी गाठली आहे. वाटाण्याचा हंगाम नसल्यामुळे ही वाढ झाली असली तरी दरांची शंभरी ओलांडण्याचा प्रकार अपवादानेच पाहायला मिळतो, अशी कबुली एपीएमसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
बेळगाव, महाबळेश्वर आणि सासवडहून मुंबईत येणाऱ्या वाटाण्याची आवक तब्बल ६० टक्क्यांनी कमी झाल्याने वाटाण्याच्या दरांनी दोन दिवसांपूर्वी शंभरी गाठली आहे.
जूनच्या मध्यात टोमॅटोने १४ रुपये प्रतिकिलो भाव गाठला, जूनअखेपर्यंत हा भाव स्थिर होता. मात्र, जुलैच्या सुरुवातीला त्यात अचानक वाढ होऊन टोमॅटो २२ रुपये किलो झाला. परंतु दोन दिवसांपासून टोमॅटोच्या दरात तब्बल १८ रुपये वाढ झाली असून ४० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rise in vegetable prices adds to inflation