scorecardresearch

गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या किमतीत वाढ?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरवाढीचा प्रस्ताव  नगरविकास खात्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत; लवकरच २,५२१ घरांसाठी सोडत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या घरांची किंमत सहा लाख रुपये असून यात पाच टक्क्यांनी म्हणजे सुमारे ३० हजार रुपये वाढ करण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली आहे. हा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असून म्हाडाकडून लवकरच एमएमआरडीएच्या २,५२१ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर घरांची किंमत निश्चित करण्यासाठी आता एमएमआरडीएकडून नगरविकास विभागाकडे विचारणा करण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या निर्णयानंतरच म्हाडाकडून सोडतीचा मुहूर्त काढण्यात येणार आहे.

 एमएमआरडीएकडून म्हाडाला हस्तांतरित झालेल्या मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेड, रांजनोळी, ठाणे येथील १,२४४, श्री विनय अगरवाल शिलोटर, रायचूर, रायगड येथील १,०१९ आणि मे. सांवो व्हिलेज, कोल्हे येथील २५८ अशा एकूण २,५२१ घरांसाठी सोडत काढण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या सनियंत्रक समितीच्या परवानगीअभावी सोडत रखडली होती. शुक्रवार, २९ एप्रिलला सनियंत्रक समितीने सोडतीस परवानगी दिली.  या परवानगीमुळे सोडतीचा मार्ग मोकळा झाला असे वाटत होते. मात्र आता पुन्हा एकदा सोडत रखडली आहे. घरांच्या किमतीच्या मुद्यावरुन सोडत रखडली आहे. एमएमआरडीएच्या घरांच्या किमती वाढविण्यासंबंधीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे घराच्या किंमतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हाडा याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही एमएमआरडीएला एका पत्राद्वारे किमतीबाबत विचारणा केली आहे. त्यांच्याकडून याबाबतचा निर्णय आल्यानंतरच आम्हाला सोडतीची तारीख जाहीर करता येईल, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.

म्हाडाकडून किमतीबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर आता एमएमआरडीएने नगरविकास विभागाला पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्राद्वारे किमतीबाबत निर्णय घेण्यासंबंधी विनंती करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये किंमतीत वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

नेमकी किती?

प्रस्तावानुसार एमएमआरडीएने सध्याच्या घरांच्या किमतीच्या पाच टक्के किंमत वाढवून मागितली आहे. म्हणजेच ३० हजार रुपयांनी किमती वाढवून त्या सहा लाख ३० हजार रुपये अशा करण्याची ही मागणी आहे. आता नगरविकास विभाग याबाबत काय निर्णय घेते यावर कामगारांना आगामी सोडतीतील घर सहा लाखात की सहा लाख ३० हजार रुपयांत मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rising house prices mill workers awaiting approval urban development department homes ysh

ताज्या बातम्या