मुंबई : मुंबईमध्ये नव्या करोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली असून त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ९९ टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. बहुतांश रुग्ण इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत. लक्षणविरहित रुग्णांच्या संपर्कात येणारे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, शेजाऱ्यांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सामाजिक अंतर, मुखपट्टीचा वापर व स्वच्छता ही त्रिसूत्री बंधनकारक नसली तरीही स्वसंरक्षणार्थ तिचा अवलंब करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईमधील करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्वच निर्बंधांमधून नागरिकांची सुटका करण्यात आली. बंधनकारक असलेला मुखपट्टीचा वापर ऐच्छिक करण्यात आला. नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी गर्दीच्या ठिकाणी स्वेच्छेने मुखपट्टीचा वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. मात्र, निर्बंध हटविताच नागरिकांना सामाजिक अंतर, मुखपट्टीचा वापर आणि हातांची स्वच्छता याचा विसर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली असून त्यामुळे यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिसरी लाट ओसरल्यानंतर करोनाविषयक कामांसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्यांच्या मूळ विभागांमध्ये पाठवणी करण्यात आली. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर नव्या रुग्णांचा पाठपुरावा, नातेवाईकांची चाचणी आदी कामांसाठी मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता विभाग कार्यालयांतील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुंबईत मंगळवारी ८५ नवे रुग्ण आढळले होते. रुग्ण दुप्पटीचा कालावधी १४ हजार ४० दिवसांवर, तर करोना वाढीचा दर ०.००५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे तूर्तास तरी धोका नाही. मुंबईत मोठय़ा संख्येने नागरिकांनी करोनाची लसमात्रा घेतली आहे. असे असले तरीही नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या मुंबईत सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये ९९ टक्के बाधितांना कोणतीच लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. लक्षणविरहित रुग्णांना घरीच औषधोपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सध्या मुखपट्टीचा वापर बंधनकारक नाही. मात्र स्वत:ची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करणे स्वहिताचे ठरेल. -सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त