मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या शीर्षकातून महाराजांचा कोणत्याही प्रकारे अपमान होत नाही किंवा हे शीर्षक त्यांचा अपमान करणारे नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले. तसेच, चित्रपटाच्या शीर्षकाला आक्षेप घेणारी याचिका फेटाळून लावताना चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट शुक्रवारी राज्यातील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी दाखल केलेल्या या याचिकेची वेळ आणि हेतूवरही यावेळी प्रश्न उपस्थित केला. तसेच, याचिकाकर्ते या याचिकेच्या माध्यमातून अनावश्यक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत नोंदवले. ‘राजा’ या शब्दाचा अर्थ जनतेचा संरक्षक असा होतो आणि शिवाजी महाराज एक सार्वभौम राजे होते, हे याचिकाकर्त्यानी स्वतःच याचिकेत मान्य केले आहे. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक कोणत्याही प्रकारे अपमानकारक भासत नाही, असे देखील न्यायालयाने तेलंगणास्थित श्री शिवाजी महाराज फाऊंडेशन या संस्थेने केलेली जनहित याचिका फेटाळताना प्रामुख्याने अधोरेखित केले.

याचिकाकर्त्यांचा दावा

चित्रपट प्रदर्शित झाला आहे का ? त्याचे शीर्षक शिवाजी महाराजांचा अपमान करणारे असल्याचे तुम्हाला का वाटते ? अशी विचारणा न्यायालयाने सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडे केली. त्यावर, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून ते छत्रपती होते. छत्रपती हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ राजांचा सर्वोच्च राजा किंवा सार्वभौम शासक असा होतो. त्यामुळे ‘राजा’ शब्दाचा वापर अपमानकारक असून तो शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतो. असा दावा याचिकाकर्त्या संस्थेच्या वतीने करण्यात आला.