मुंबई : गेली दहा वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित भव्यदिव्य ऐतिहासिकपट बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी सोमवारी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली.
पहिल्यांदाच मराठी आणि हिंदीत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचा भाग असलेले अभिनेता संजय दत्त, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, अभिनेत्री विद्या बालन, भाग्यश्री पटवर्धन अशी तारेतारकांची मांदियाळी ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला उपस्थित होती.
‘गेले दशकभर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. २०१६ मध्ये हा प्रयत्न सफल झाला नाही, २०१९ मध्ये पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीचा प्रस्ताव पुढे केला आणि कोविडचे महासंकट समोर आले. अखेर, २०२३ मध्ये निर्धाराने या चित्रपटाच्या तयारीला लागलो आणि आज महाराजांचा एक मावळा या भावनेनेच ‘राजा शिवाजी’ ही कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवतो आहे’ हे सांगताना दिग्दर्शक आणि शिवाजी महाराजांची भूमिका अशा दुहेरी जबाबदारीचे शिवधनुष्य पेलणाऱ्या रितेश देशमुख यांचा कंठ दाटून आला होता.
‘महाराष्ट्राच्या ज्या मातीत आम्ही जन्म घेतला, तिथे शिवाजी राजांवरच्या चित्रपटाची निर्मिती होते आहे म्हटल्यावर या चित्रपटाचा भाग होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे’ अशी भावना चित्रपटात अफझल खानची भूमिका साकारलेल्या अभिनेता संजय दत्त याने व्यक्त केली.
‘राजा शिवाजी’च्या ट्रेलर अनावरण सोहळ्यात जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे यांच्यासह निर्माती, अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल, अभिनेता-दिग्दर्शक अमोल गुप्ते हेही उपस्थित होते. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
फक्त रितेशभाऊंसाठी…
रितेशचे आणि माझे वडील या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती, त्यांच्यातील त्या नात्याची आठवण ठेवत मी रितेशबरोबर हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला, असेही संजय दत्त यांनी सांगितले. तर रितेश हा माझा लहान भाऊच आहे, त्याच्याकडून एखाद्या गोष्टीसाठी विचारणा झाल्यानंतर नकार देणेच शक्य नाही. आणि त्याच्या दिग्दर्शनात ‘राजा शिवाजी’सारख्या मोठ्या कलाकृतीचा भाग होता आले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे अभिनेता अभिषेक बच्चन यांनी सांगितले. या चित्रपटात बोमन इराणी आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मी तर रितेशची वाट पाहात होते…
‘राजा शिवाजी’ चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने बडी बेगमची भूमिका केली आहे. ‘या चित्रपटाच्या निर्मितीची माहिती मिळाली तेव्हा रितेशने अजून मला कुठल्याच भूमिकेसाठी का विचारले नाही, असा प्रश्न मला सतावत होता. एक दिवस त्याने खरोखरच या चित्रपटात बडी बेगमची भूमिका करणार का? अशी विचारणा केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावरची उत्सूकता लपवत मी होकाराकरता एक दिवस त्याच्याकडून मागून घेतला, पण खरेतर मी मनापासून या संधीची वाट पाहात होते’, अशी आठवण विद्या बालन हिने सांगितली.
