‘राजा शिवाजी’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्यापासून चित्रपटाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. जिओ स्टुडिओज निर्मित, रितेश विलासराव देशमुख निर्मित आणि अभिनित या चित्रपटात पहिल्यांदाच संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री पटवर्धन अशी हिंदीतल्या नावाजलेल्या कलाकारांची मांदियाळी आहे. मराठीतले उत्तम कलाकार चित्रपटात आहेतच, पण हिंदीतील कलाकारांनीही स्वत:हून या चित्रपटाचा भाग होण्याची तयारी दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ऐतिहासिकपट आणि मराठी-हिंदीतील उत्तम कलाकारांची साथ यामुळे ‘राजा शिवाजी’ हा इतक्या भव्य स्तरावर केलेला पहिला मराठी चित्रपट आहे, असा विश्वास रितेश देशमुख आणि चित्रपटाची निर्माती जिनिलिया देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शौर्यपर्वांपैकी निवडक प्रसंगांतून त्यांची ख्याती देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा मराठी चित्रपट म्हणून सुरुवात झालेला हा चित्रपट आज जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे यांच्या सहकार्यामुळे मराठी-हिंदीत एकाचवेळी प्रदर्शित होणारी भव्य कलाकृती म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे, असं रितेश देशमुख यांनी सांगितलं. ‘गेली दहा वर्षे आमचं कुटुंब शिवकालीन इतिहासात रमलं आहे. रितेश स्वत: उत्तम कथाकार आहे. या काळात महाराजांवरची ३० ते ४० पुस्तकं अभ्यासून दररोज मुलांना आणि मला रोज त्यांची नवीन कथा नेमाने सांगण्याचं काम त्याने केलं. त्यामुळे हा चित्रपट आमच्या भावविश्वाचा भाग झाला आहे’, असं जिनिलिया यांनी सांगितलं.
शिवबा ते रयतेचा राजा
‘महाराजांचं आयुष्य आणि त्यांनी केलेलं कार्य याचा पैस खूप मोठा आहे. आणि हे सगळं एका चित्रपटात मांडणं अशक्य आहे, त्यामुळे त्यांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचवताना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, याचा विचार आम्ही पहिल्यांदा केला. या चित्रपटात आम्ही फक्त शिवाजी महाराजांची नव्हे तर त्यांच्या कुटुंबाची गोष्टही सांगितली आहे. शिवाजी महाराजांना संभाजी नावाचे सख्खे थोरले बंधू आहेत, हा इतिहास फारसा लोकांना माहितीचा नाही. या दोघा भावांचं नातं कसं होतं? शहाजी राजांना पुण्यातून आपल्या मूळ कुटुंबापासून दूर जावं लागतं, ते कर्नाटकात पोहोचतात तेव्हा तिथेही काही घटना अशा घडतात की त्यांचा परिवार विखुरतो. संभाजी शहाजी राजांबरोबर थांबतात, तर जिजाऊ शिवबांना घेऊन रायगडावर येतात. स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचे प्रयत्न करतानाच पाठीमागे घडलेल्या या घटनांचाही एक इतिहास आहे, जो या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल’, असं रितेश यांनी सांगितलं.
ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमॅटिक मांडणी ‘दहा वर्षांपासून या चित्रपटासाठी शिवाजी महाराजांवरचे संदर्भ साहित्य, कादंबरी या सगळ्याचे वाचन-अभ्यास सुरू होता. इतिहास संशोधकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं, आपण अभ्यासलेल्या गोष्टी त्यांच्याकडून पडताळणी करून घेणं ही सगळी दीर्घ प्रक्रिया आम्ही या चित्रपटासाठी केली. फक्त सत्य घटना समोर ठेवून मांडणी केली तर तो माहितीपट होईल. सिनेमा करताना दोन पात्रांमधील संवाद, त्यांच्या नेमक्या कृती हे तुम्ही कल्पना करूनच लिहिलेल्या असतात, कारण शेवटी तुम्हाला त्या पात्रांच्या भावनिक प्रवासात प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचं असतं. त्यामुळे ऐतिहासिक घटना समोर ठेवून सिनेमॅटिक तंत्रानेच ऐतिहासिक चित्रपट केले जातात आणि ‘राजा शिवाजी’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
निर्माता-दिग्दर्शक म्हणून आमच्यात उत्तम समन्वय ‘मुंबई फिल्म कंपनी’ची आम्ही सुरुवात केली तेव्हापासून आत्तापर्यंत पंधरा-सोळा वर्षे झाली आहेत. एखादा चित्रपट मला करावासा वाटतो तेव्हा त्याची कल्पना मी जिनिलियाला ऐकवतो. त्यानंतर तो चित्रपट कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर येऊ शकेल, त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी-नियोजन ही सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. जिनिलिया स्वत: उत्तम अभिनेत्री असल्याने त्यांचाही अनुभव दांडगा आहे, इतक्या पटकथा त्यांच्या नजरेखालून गेलेल्या असल्याने कुठली कथा प्रेक्षकांना आवडेल, याचीही त्यांना उत्तम जाण आहे. आमच्या दोघांमध्येही त्याबाबतीत उत्तम समन्वय असल्याने हा चित्रपट निर्मितीचा प्रवास इथवर येऊन पोहोचला आहे’, असंही रितेश यांनी सांगितलं.
राजकारणात काहीही घडो…
‘शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्त्व हे चिरंतन आहे. त्यांच्याविषयी जितकं समजून घ्यावं, जितकं बोलावं-ऐकावं तितकं कमी आहे. त्यांची ख्याती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती, काळ चांगला आहे, हे पाहण्याची गरज नसते. राजकारणात काहीही घडो… सच्चा शिवप्रेमी हा कायम महाराजांच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. ‘राजा शिवाजी’ चित्रपट करतानाही मी आधुनिक काळातील महाराजांचा मावळा आहे, हीच भावना माझ्या मनात होती आणि त्या प्रेमातूनच ही कलाकृती साकारली आहे’, अशी भावना रितेश यांनी व्यक्त केली.
सलमानने विचारताच फजिती झाली…
अभिषेक, विद्या, संजय दत्त, फरदीन अशा सगळ्या कलाकारांबरोबर मी याआधी काम केलेलं होतं. त्यांना या चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा करताच प्रत्येकाने होकार दिला. आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे या मातीतल्या भाषेत शिवाजी महाराजांवर चित्रपट होणार असेल तर आम्हाला त्याचा भाग व्हायचे आहे, हीच त्या प्रत्येकाची भावना होती’ अशी आठवण रितेश यांनी सांगितली. मात्र, सलमानने स्वत:हून माझी भूमिका कोणती अशी विचारणा केली आणि फजिती झाली, असं त्यांनी सांगितलं. तुझ्या चित्रपटात मी असणारच… असे सलमानने ठाम म्हटल्यानंतर त्याचा ‘राजा शिवाजी’ चित्रपटात प्रवेश झाला, असंही त्यांनी सांगितलं.
