मुंबई : महापौर रितू तावडे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल आणि निळ्या दिव्यांवरून टिका झाल्यानंतर सोमवारी सभागृह नेते गणेश खणकर आणि महापौर रितू तावडे यांनी एका पत्रकार परिषदेतून विरोधकांवर टीका केली. विरोधकांकडे घड्याळ, लाल दिवे, वेणी- फणी, साडी या पलिकडे विषयच उरले नसल्याचा आरोप महापौर रितू तावडे यांनी केला. तर महायुतीच्या कामामुळे मतपेटीला धक्का लागल्यामुळे विरोधक आरोप करीत असल्याचा आरोप खणकर यांनी केला.
महापौर रितू तावडे यांच्या वाहनावरील लाल आणि निळ्या दिव्यांमुळे वाद उद्भवल्यानंतर महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरील लुकलुकणारे दिवे प्रशासनाने हटवले आहेत. या वादाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, लखलखणारे दिवे बसवा म्हणून प्रशासनाकडे कुठलीही मागणी केलेली नव्हती. पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनाने जे दालन दिले, जे वाहन दिले ते मी स्वीकारले. मी कोणतीही मागणी केली नव्हती. गाडीला दिवे लावण्याचा निर्णय प्रशासनाचा आहे. राज शिष्टाचार विभागाने नियम तपासून तसे निर्देश द्यायला हवे होते. त्यामुळे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले.
विरोधकांकडे विषयच नाही…
एक कोटीचे घड्याळ, लाल दिवा, वेणी-फणी, साडी या शिवाय विरोधकांकडे विषय उरलेले नाही, असा टोला महापौरांनी यावेळी विरोधकांना लगावला. माजी सत्ताधारी आणि आताच्या विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांनीच महापौरांच्या गाडीवर लाल दिवा बसवावा म्हणून मागणी केली होती असा आरोप खणकर यांनी केला. तसेच माजी महापौरांच्या काळातील काही ध्वनिचित्रफिती यावेळी दाखवल्या.
महायुतीच्या कामांमुळे विरोधक बिथरले
महायुतीने सत्तेवर येताच कामांचा सपाटा लावला असून महायुतीच्या कामांमुळे विरोधक बिथरले असल्याचा आरोप सभागृह नेत्यांनी केला. शैक्षणिक वस्तूंची खरेदी जेम पोर्टलवरून केली जाणार असल्यामुळे विरोधक आता कांगावा करीत आहेत असाही आरोप त्यांनी केला. बांग्लादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाई केल्यामुळे विरोधकांची आदळआपट सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
महापौरांना लक्ष्य कोण करतंय
महापौरांना लक्ष्य केले जात असल्याचे विधान रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यावर पक्षांतर्गत व्यक्तींकडून लक्ष्य केले जात असल्याचे वाटते का असा सवाल पत्रकारांनी केली. तेव्हा महापौरांनी ही शक्यता फेटाळून लावली. महापौर पदासाठी स्पर्धा असली तरी एकदा निवड झाल्यानंतर ही स्पर्धा संपली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
