मुंबई : मी ‘रील स्टार’ आहे की ‘रिअल स्टार’, हे मुंबईकर ठरवतील अशा शब्दात महापौर रितू तावडे यांनी भर सभागृहात मध्यरात्री विरोधकांना प्रत्युत्तर दिले. पावसाळ्यात ज्या-ज्या ठिकाणी आपत्तीजन्य घटना घडल्या, त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहिले होते, याचीही आठवण त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली. पावसाळी दुर्घटनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली विशेष बैठक सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोपांमुळेच अधिक गाजली.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. तसेच बाराशेहून अधिक झाडे व फांद्या कोसळल्यामुळे काही जण जखमी झाले. त्यामुळे मुंबईत पावसाळ्यात उद््भवणाऱ्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळणे, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा व्हावी या उद्देशाने शुक्रवारी १० जुलै रोजी पालिका सभागृहाची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, काँग्रेसचे अश्रफ आझमी तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या श्रद्धा जाधव आणि टी. जगदीश यांच्या मागणीनुसार या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या वेळी विरोधकांनी महापौरांच्या आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्ताधाऱ्यावर आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप केले. बैठकीच्या शेवटी त्याला सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले. सर्वात शेवटी रितू तावडे यांनी चर्चेचा समारोप करताना सगळ्या आरोपांचा समाचार घेतला.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका करत सांगितले की, किशोरी पेडणेकर महापौर असताना भाजपने कंगना रणौत प्रकरण, नर्सिंग होममधील रुग्ण सुरक्षा, अग्निसुरक्षा तसेच अविश्वास ठरावासंदर्भात विशेष बैठकीची मागणी केली होती. मात्र, त्या वेळी अशा कोणत्याही विशेष बैठका बोलाविण्यात आल्या नव्हत्या. यासंदर्भातील पत्रव्यवहार आणि संबंधित तारखा त्यांनी सभागृहात वाचून दाखवल्या.

शिंदे यांनी पुढे सांगितले की, २०१३ ते जुलै २०१८ या कालावधीत मुंबईत २१,४५२ झाडे अथवा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये ३० नागरिकांचा मृत्यू झाला, तर २५६ जण जखमी झाले. त्या काळात तत्कालीन महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच डिसेंबर २०१७ मधील कमला मिल आग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही अशा प्रकारची राजीनाम्याची मागणी करण्यात आली नव्हती, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

‘राम मंदिर के चोरोंको, जुते मारो सालोंको…

विशेष सभेला सुरुवात होताच भाजपाच्या नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. विरोधकांनीही ‘जय जय श्रीराम’चा जोरदार नारा दिला. तसेच ‘राम मंदिर के चोराें को, जुते मारो सालोंको, ‘ अशी जोरदार घोषणाबाजी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी केली.दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त उपस्थित नसल्याने सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब झाले. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर येत सरकारचा निषेध केला. शिवसेनेचे सर्व नगरसेवक ‘जय श्रीराम’च्या टोप्या घालून आले होते.

त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.काँग्रेसच्या नगरसेवकांचा काळे कपडे घालून निषेध काँग्रेसच्या नगरसेवकांनी पावसाळ्यात घडलेल्या दुर्घटनांबद्दल जबाबदार असलेल्या सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाचा काळे कपडे घालून निषेध केला. काँग्रस पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारात काळे फुगे लावण्यात आले होते.