मुंबई : मुंबईला महापौर मिळून एक महिना उलटल्यानंतरही महापौर रितू तावडे यांनी अद्याप महापौर निवासस्थानात प्रवेश केलेला नाही. भायखळा येथील राणीच्याबागेत सध्या महापौर निवासस्थान असून या बंगल्याची पुन्हा एकदा डागडुजी करण्यात येणार आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून बंद असलेल्या या बंगल्याच्या सजावटीसाठी मुंबई महापालिकेचा कार्यकारी अभियंता विभाग लवकरच निविदा काढणार आहे.
दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत आता दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होत आहे. त्यामुळे प्रशासक नेमण्याच्या आधी मुंबई महापालिकेतील महापौरांचे वास्तव्य हे भायखळ्यातील राणी बागेतील नव्या महापौर बंगल्यात हलवण्यात आले. राणी बागेतील हा बंगला १९३१ साली बांधण्यात आला. ब्रिटीशांच्या सोयीसाठी हा बंगला बांधण्यात आला होता. १९७४ पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थानही बनले होते. त्यानंतर याचा वापर महापौरांसाठी होऊ लागला.
राणी बागेतील बंगला साधारण सहा हजार चौरस फुटांचा आहे. राणी बागेतील पाटणवाला मार्गाला समांतर असलेला व सागवान लाकडाची संरचना असलेला कौलारू बंगला आहे. प्रशासक काळात या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही ठिकाणी वाळवी लागली होती. तर काही लाकडी फर्निचरचीही दुरावस्था झाली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काही महिने आधीच या बंगल्याची डागडुजीचे काम हाती घेतले. या कामासाठी निविदा काढून कंत्राटदाराला काम देण्यात आले. संरचनात्मक दुरूस्ती, कौलांच्या आधारलाकडाची दुरूस्ती, पेटिंग व पॉलिशिंगची कामे, वाळवी प्रतिरोधक कामांसह अन्य कामे कंत्राटदारांकडून करण्यात आली. ही कामे पूर्ण झाली असून आता बंगल्याच्या अंतर्गत सजावटीसाठी कार्यकारी अभियंता विभाग आणखी निविदा काढणार असल्याचे समजते.
महापौर रितू तावडे या अद्याप घाटकोपर येथील आपल्या निवासस्थानीच राहत आहेत. अद्याप त्यांनी भायखळ्यातील महापौर बंगल्यात प्रवेश केलेला नाही. नव्याने महापौर येण्याआधी महापौर बंगल्याच्या बाह्य भागाची दुरुस्ती करण्यात आली होती. तर आता अंतर्गत सजावटीसाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. महापौरांच्या सूचनेनुसार अंतर्गत सजावटीत पुन्हा बदल करून नविन फर्निचरही घेण्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
ही निविदा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीतही मंजुरीसाठी येणार असून मंजुरी मिळताच महापौर बंगल्याच्या अंतर्गंत सजावटीसाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या महापौरांचा बंगल्यातील प्रवेश लांबणीवरच पडणार आहे.
रितू तावडे यांची प्रतिक्रिया…
“मी आजही घाटकोपर येथील माझ्या निवासस्थानी वास्तव्यास आहे. मुंबई महापौर निवासस्थानाच्या (भायखळा) दुरुस्तीबाबत मी महानगरपालिका प्रशासनाकडे कोणतीही स्वतंत्र मागणी केलेली नाही. महापौर निवासस्थान ही महानगरपालिकेची मालमत्ता आहे. त्याच्या देखभाल व आवश्यक दुरुस्तीचे निर्णय संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियमित प्रक्रियेनुसार घेतले जातात. कृपया त्या प्रशासकीय प्रक्रियेशी माझा कोणताही संबंध जोडू नये.”- रितू तावडे, महापौर, मुंबई महानगरपालिका
