मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्यासाठी अतिरिक्त रक्षक नेमण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेत आधीच सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असताना सुरक्षा रक्षक वाढवण्याबाबत रितू तावडे यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक पाळीत दोन याप्रमाणे सहा सुरक्षारक्षक त्यांच्यासाठी नेमण्यात आले आहेत.
महापौर रितू तावडे या गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत असून त्यांच्या दालनातील सुरक्षाव्यवस्था वाढवल्यामुळे एक नवीनच वाद निर्माण झाला आहे. सुरक्षा वाढवण्यासाठी स्वतः महापौरांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानंतर महापौरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र आधीच मुंबई महापालिकेत सुरक्षारक्षकांची संख्या कमी असताना महापौरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्यामुळे विरोधी पक्षाने टीका केली आहे.
मुंबई महानगर पालिकेत ३ हजार ८१२ कर्मचारी सुरक्षा रक्षक आहेत. यामध्ये १०० वरिष्ठ सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. मात्र, या विभागात ४० टक्क्याहून अधिक जागा रिक्त आहेत. तर पालिकेने २ हजार ६०० खासगी सुरक्षा रक्षकही कंत्राटी घेतलेले आहेत. पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय, रुग्णालय आणि पालिकेशी निगडित इतर विभागांमध्ये हे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. त्यातच महापौरांच्या सुरक्षेत वाढ केल्यामुळे नवीन वाद उद्भवला आहे.
आतापर्यंतच्या काळात महापौरांना तीन पाळ्यांमध्ये तीन सुरक्षा रक्षक महापौरांसाठी तैनात असायचे. मात्र सुरक्षा वाढवल्यानंतर महापौरांना एका पाळीत दोन असे तीन पाळ्यांमध्ये सहा सुरक्षा रक्षक देण्यात आले आहेत.
दरम्यान, याबाबत महापौर रितू तावडे यांनी जाहीर पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, मी महापौर झाल्यापासून दिवसाला तीनशे-चारशे लोक भेटायला येतात. त्यांचे नियोजन करणे मुश्कील होते. माझ्याकडे कर्मचारी वर्ग कमी आहे. लोक प्रमाणाच्या बाहेर येतात. शेवटच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय मी कार्यालय सोडत नाही. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत गर्दी असते. कर्मचाऱ्यांनाही त्रास होतो म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली. त्याचबरोबर मी बांगलादेशी, रोहिंग्यांचा विषय उचलून धरला आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची आवश्यकता असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले.
