मुंबई : प्रतिस्पर्धी राजकारणी आणि विरोधकांचा समाजमाध्यमावरील प्रभाव कमी करण्यासाठी आता व्यावसायिक हॅकर्सची मदत घेतली जात आहे. यामध्ये विरोधकांचे समाजमाध्यमावरील खाते हॅक करणे, ती गोठवणे तसेच त्यांच्या चॅनल्सचे व्हूज कमी करणे, त्यांच्या पोस्टचा रिच कमी केला जात आहे. हा गंभीर धोका असून अनेकाना त्यांची अद्याप कल्पनाही आलेली नाही.सत्ताधाऱ्यांकडून राजकीय विरोधकांची नेहमीच विविध प्रकारे कोंडी केली जात असते.

काळ बदलला असून सर्वच जण समाजमाध्यांवर सक्रीय झाले आहेत. समाजमाध्यमांवरील विविध खात्यातून ते आपले विचार आणि मत मांडत असतात. त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी जल्पके (ट्रोलर्स) सोडले जात होते. परंतु आता विरोधात बोलणार्यांचा समाजमाध्यमांवरचा प्रभाव कमी करण्याचे व्यावसायिक हॅकर्स आणि आयटी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

असा केला जातो प्रभाव कमी

एआय बॉट्सद्वारे कृत्रिम ट्रेंड्स तयार करणे, चुकिची माहिती पसरविण्यासाठी डिजिटल एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) पॅनल्सचा किंवा चॅट बॉट्सचा वापर करणे, रिपोर्ट्सचा किंवा रेड फ्लॅगचा भडिमार करून अल्गोरिदममध्ये कृत्रिमरित्या फेरबदल घडवून आणले जात आहेत. काही हॅकींग तंत्राच्या सहाय्याने पेजवरील पोस्टचा पोहोच (रीच) रोखण्यात येतो. अकाऊंट किंवा पेज व्यवस्थित सुरू असते पण त्यावर काहीच (ॲक्टीव्हिटी) करता येत नाहीत; त्या रोखल्या जातात. विरोधात आवाज उठविणाऱ्या युट्यूबर्सचे पोहोच (रिच) कमी केले जातात. काही वेळेस त्यांच्या टीम किंवा कार्यालयाचे इंटरनेट सर्व्हर हॅक करून सर्व डेटा चोरी केला जातो. कोणत्या रणनिती (स्ट्रॅटेजी प्लॅन) आखल्या जात आहे, हे समजून घेतले जाते आणि त्यांचा डेटा चोरला जातो.

अनेक राजकीय पक्षांचे नेते, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते तसेच युट्यूब चॅनल्स चालविणाऱ्यांना याची प्रचिती येत आहे. अशा तक्रारी वैभव छाया, मुक्ता कदम यांनी केल्या आहेत. मी पोस्ट करतो पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, सातत्याने हे जाणवू लागले आहे असे शिवसेना ठाकरे गटाच्या जयेश वाणी यांनी सांगितलं. राजकारणात ही गंभीर रणनीती वापरली जात असून विरोधकांची हवा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकजण याविषयी चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांना अजून याची कल्पनाही आलेली नाही.

नाव न सांगण्याच्या अटीवरुन एका व्यावसायिक हॅकरने माहिती दिली की, सध्या राजकीय नेत्यांसाठी त्यांचे सोशल मिडिया पेजेस आणि डिजिटल इमेज महत्त्वाची झाली आहे. अशा स्थितीत त्यांच्या प्रतिस्पर्धीला हटविण्यासाठी किंवा त्यांचा समाज माध्यमातील प्रभाव कमकूवत करण्यासाठी आमच्याकडे काम दिले जात आहे.आम्ही विविध तांत्रिक क्लृपत्या वापरून लोकांना न कळत त्यांच्या समाजमाध्यमावरींल प्रभाव आम्ही कमी करत आहोत. या कामासाठी हॅकर्स आणि आयटी तज्ञांना गलेलठ्ठ रक्कम दिली जात आहे.त्यामुळे पुढील काळात सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.