Mumbai BMC Corporation Elections 2026 LIVE Votiing मुंबई:  मतदारांना पैसे वाटल्याचे प्रकरण ताजे असताना बुधवारी मध्यरात्री मशीनमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपावरून चेंबूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.  अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून गर्दीला पांगवले असून तेथील मतदानच रद्द करण्याची मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १५३ मधील घाटले गाव परिसरात बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत त्या ठिकाणी असून माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या पत्नी मीनाक्षी पाटणकर या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे ( शिंदे) आमदार तुकाराम काते यांची सून तन्वी काते या रिंगणात आहेत.

चेंबूरमधील सर्वात महत्वाची आणि चुरशीची अशी ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्याने चेंबूरमधील नागरिकांचे या लढतीकडे लक्ष आहे. मात्र मंगळवारी दुपारी घाटले गाव परिसरातील शिवशक्ती मंदिर जवळ शिंदे गटाच्या उमेदवार तन्वी काते यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पैसे वाटणाऱ्या एकाला पकडून गोवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही घटना ताजी असताना बुधवारी मध्यरात्री एकाच्या सुमारास काही जण मतदान केंद्रात घुसून या यंत्राशी छेडछाड करत असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी घाटले गावातील पालिका शाळेकडे धाव घेतली. तेथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागला होता. शिंदे गटाकडून यंत्रात छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील मतदान रद्द करावे अशी मागणी माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केली आहे.