नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सातारा आघाडीवर

धोकादायक वळणदार रस्ते, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे यासह अन्य कारणांमुळे राज्यातील रस्ते अपघात क्षेत्रांमध्ये (ब्लॅक स्पॉट) मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी अपघातातही वाढ होत आहे.

२०१४ पासून ते आतापर्यंत राज्यात एक हजार ३२४ अपघात क्षेत्रांची नोंद झाली आहे. २०१६ नंतर यात ५८५ अपघात क्षेत्रांची भर पडल्याचे समोर आले आहे. गेल्याच महिन्यात यासंदर्भातील अहवाल महामार्ग पोलिसांनी शासनाला सादर केला. राज्यात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यास राज्य शासनाबरोबरच खुद्द वाहनचालकही अपयशी ठरत आहेत.

दारू पिऊन किंवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे ही प्रमुख कारणे अपघातांमागे असली तरी रस्त्यांची दुरवस्था, धोकादायक वळणे, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे, गतिरोधक नसणे हे घटकदेखील तेवढेच कारणीभूत ठरत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी फक्त वेळकाढूपणाच शासनाकडून केला जात आहे. ५०० मीटर क्षेत्रामध्ये सलग तीन वर्षांत एकूण पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर अपघात अथवा एक किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झाले असतील अशा अपघात प्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) माहिती गोळा केली जाते. महामार्ग पोलिसांनी या अपघात क्षेत्रांच्या माहितीचा अहवाल शासनाला सादर केला असून यात २०१४ पासूनची माहिती दिली आहे. आजघडीला अपघात क्षेत्रांची संख्या सुमारे १,३२४ इतकी झाली. २०१४ ते २०१६ या काळात ७३९ अपघात क्षेत्रे होती. त्यानंतर मात्र त्यात वाढच होत आहे. अपघात क्षेत्रांमध्ये सर्वाधिक नाशिक ग्रामीण भागात १०७ क्षेत्रे आहेत. २०१६ पर्यंत नाशिक ग्रामीण भागांत ५८ क्षेत्रे होती. हे पाहता मोठी भरमसाठ वाढ झाल्याचे दिसते.

नांदेडमध्ये ८७, कोल्हापूर व साताऱ्यामध्ये अनुक्रमे ८५ व ८४ अपघात क्षेत्रे आहेत. त्यानंतर अन्य ग्रामीण व शहरी भागांचा नंबर लागतो. देशभरात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून निवृत्त न्यायाधीश राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दोन ते अडीच वर्षांपूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडून अपघात क्षेत्रांची माहिती घेतली जात असून विविध क्षेत्रातील दहा तज्ज्ञही नेमण्यात आले आहेत.

मुंबई, नागपुरातील स्थिती

आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत ५१ अपघात क्षेत्रे आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातही २४ क्षेत्रे असल्याचे समोर आले आहे. यात मात्र वाढ झालेली नाही. नागपूर ग्रामीण भागात यापूर्वी एक क्षेत्र असताना त्याची संख्या थेट ४२ पर्यंत आली आहे. मुंबईतही २०१६ पर्यंत ३९ अपघात क्षेत्रे होती.

विदारक चित्र

२०१७ मध्ये ३५ हजार ८५३ अपघातांत १२ हजार २६४ जणांचा मृत्यू झाला. तर २० हजार ४६५ जण गंभीर जखमी झाले. २०१८ मध्ये आतापर्यंत ९ हजार २४३ अपघातांत ३ हजार ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

धोकादायक वळणदार रस्ते, गतिरोधक नसणे, संरक्षक भिंत नसणे यांसह अन्य काही कारणांमुळे अपघात होतात. अशा अपघात क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले. महामार्ग पोलीस, आरटीओ, वाहतूक पोलीस यांसह रस्ते शासनाच्या ज्या संबंधित विभागांर्तगत येतात अशा यंत्रणांनी मिळून याचा अहवाल तयार केला आहे. शासनाला तो सादर केला असून त्यावर उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे अपघात पूर्णपणे कमी होण्यास मदत मिळेल.    – विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस मुख्यालय

काही महत्त्वाचे व मोठय़ा प्रमाणात होणारे अपघात क्षेत्र

  • अमरावती शहर- हायवे पूल जित धाबा, कोण्डेश्वर टी पॉईंट, एमआयडीसीजवळ
  • औरंगाबाद शहर- गोलवाडी फाटा, एमआयटी चौक बीड बायपास, बेलापूर फाटा बीड बायपास
  • नागपूर शहर व ग्रामीण- जुना परडी नाका, प्रकाश हायस्कूलजवळ, चिंच भवन चौक, पतंग सवंनीगी, बुरुजवाडा, वारेगाव शिवार, गडकरी चौक
  • नाशिक शहर व ग्रामीण- ट्रक टर्मिनल, के.के. वाघ कॉलेजजवळ, रायगडजवळ, चाळीसगाव फाटा, राहुड घाट, मोहादरी घाट, घोरवड घाट, चोंदी घाट,
  • नवी मुंबई शहर- नावाडे फाटा, कळंबोली पूल ते कळंबोली सर्कल, कळंबोली सर्कल ते फायरब्रिगेड चौक, आरएएफ जंक्शन
  • सोलापूर शहर-केगाव, बाले चौकी, जुना पुणे नाका, सोरेगाव, जुना तुळजापूर नाका, सिंहगड इन्स्टिटय़ूट केगाव
  • अहमदनगर- घोडेगाव, करंगी घाट, राहुरी, पवारवाडी घाट
  • अमरावती ग्रामीण-नागझरी फाटा
  • औरंगाबाद ग्रामीण- कागजीपुरा, औरंगाबाद नाका, वेरुळ घाट, अंबाडी डॅम, अजिंठा हिल
  • बीड- गौराई (रा. महामार्ग -२११), मांजरसुंभा घाट ते कोळवाडी, मंजेरी फाटा ते पाली
  • भंडारा- नागपूर नाका पॉइंट, पिंपळगा बस स्टॉपजवळ, वैनगंगा पूल
  • बुलढाणा- खामगावजवळ तरोडा फाटा, खामगाव शहर
  • चंद्रपूर- हरदोळाजवळ, केसलाघाट
  • धुळे- बाभळे फाटा, अंमळनेर चौफुली
  • गडचिरोली- डोंगरी पेट्रोल पंप ते कृषी विद्यापीठ
  • गोंदिया- खडकी फाटा ते चिंचगाव फाटा, बाळाघाट पॉइंट
  • जळगाव- शिव कॉलनी स्टॉपजवळ
  • कोल्हापूर- लक्ष्मी टेकडी, नागाव फाटा, आंबावडे गाव
  • लातूर- मंदापूर पट्टी ते भंटंगळी फाटा,
  • नांदेड- वाहेगाव बायपास रोड, पिंपळगाव जवळ, मंगरुळ घाट
  • पुणे ग्रामीण- खेडशिवापूर दर्गा फाटा, छेलाडी फाटा
  • पालघर- सातिवली खिंड, भारोळ, नांदगाव, आंबोली
  • रायगड- खोपोली एक्झिट, विरफाटा, वाशी फाटा, सुकेळे खिंड
  • रत्नागिरी- भोस्ते घाट, कामठेजवळ, अरवली, निवाळी घाट, आंबा घाट, वेरळ घाट, कशेडी, बोरघर, परशुराम घाट
  • सांगली-कासेगाव, पेठ नाका,
  • सातारा- खंडाळा घाट, बोरगाव, नागाठणे,
  • ठाणे शहर व ग्रामीण- दिवा पेट्रोल पंप, ओवळा गाव, खारेगाव टोल नाका, मानकोली नाका, आर.सी. पाटील नारपोली, दिवा गाव, खारेगाव पूल, पिंपळस फाटा, राजनोळी नाका, दुर्गाडी पूल, गोवे नाका, कोपरी पूल, तीन हात नाका, नितीन नाका, माजिवडा, चेरपोली घाट, कसारा बायपास, उंबरमाळी शिरोळ फाटा, जुना कसारा घाट, घोडबंदर खिंड, कल्याण फाटा, शिळफाटा, रेती बंदर, गायमुख, माळशेज घाट