scorecardresearch

बडतर्फ पोलिसाकडून सराफाची लूट ;आग्रीपाडा पोलिसांकडून चौघांना अटक

भायखळा परिसरातील सराफाला गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्यांनी चार लाखांना लुटल्याचा प्रकार बुधवारी घडला होता.

मुंबई : भायखळा परिसरातील सराफाला गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्यांनी चार लाखांना लुटल्याचा प्रकार बुधवारी घडला होता. या टोळीचा म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नसून एक बडतर्फ पोलीस असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी बडतर्फ पोलीस नाईक चंद्रकांत गवारे याच्यासह चौघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी दिली.
तक्रादार मोहम्मद शिराज इफतकार शेख हे भायखळा पश्चम येथील रहिवासी आहेत. भायखळा येथील मोरलॅण्ड रोडवरील आगखाना बिल्डिंग येथे त्यांची सोन्या-चांदीचे दागिने घडविण्याची पेढी आणि दुकान आहे. बुधवारी त्यांच्या कारखान्यात तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून तुम्ही सोने बेकायदेशिररीत्या वितळवत आहात. त्यामुळे सर्व वस्तू आम्ही जप्त करत असून त्यासाठी तुम्हाला १० लाख रुपये दंड भरावा लागेल.
यावेळी तक्रारदार शेख त्यांना समजवण्यास आले असता त्यांनी शेखला मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातून तीन हजार रुपये काढून घेतले. तसेच दंडाची रक्कम भरायची नसेल, तर पाच लाख रुपये देण्यास सांगितले. तडजोडीअंती ते चार लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाले. यावेळी आरोपींनी एका ग्राहकासह तिघांना डांबूनही ठेवले. याबाबतची तक्रार आग्रीपाडा पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेकवडे व उपनिरीक्षक दत्ता पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले. या पथकातील पोलीस नाईक सचिन खानविलकर, पोलीस शिपाई रणजीत आपसुंदे व पोलीस शिपाई हिरालाल सरांडे यानी २४ तासांत याप्रकरणी चौघांना अटक केली. बडतर्फ पोलीस नाईक चंद्रकांत गवारे, योगेश लाड, सागर सिंग व नावेद अशी अटक आरोपींची नावे आहेत.
गवारे व नावेद यांच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. गवारे याने २०१७ मध्ये बोरिवलीतील हिरे व्यावसायिकाला धाक दाखवून त्याच्याकडून २४ लाखांचे हिरे लुटले होते. त्याप्रकरणी गवारेला अटक झाल्यानंतर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. यावर्षी जानेवारी महिन्यातही गवारे याच्या टोळीने पायधुनीतील व्यावसायिकाला पोलीस बनून लुटले होते. तसेच नावेद याच्याविरोधातही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Robbed police four arrested agripada police officers crime branch amy

ताज्या बातम्या