साडेपाच कोटींच्या फसवणूकप्रकरणी परदेशी नागरिकाला दिल्लीतून अटक

मुंबई : बँकेच्या तांत्रिक प्रणालीमध्ये इंटरनेटद्वारे प्रवेश करून सुमारे साडेपाच कोटी रुपये लुटल्याप्रकरणी एका परदेशी नागरिकाला दिल्लीतून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले. विविध २० बँकांतील ७८ खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली होती. त्यातील ८६ लाख रुपये पोलिसांनी गोठवले आहेत.

मायकल चिबुझी ओकोन्को (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ११ मोबाइल, दोन हार्ड डिस्क, तीन लॅपटॉप व सिम कार्ड जप्त करण्यात आले. आरोपीने त्याच्या मित्राच्या मदतीने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फसवणुकीतील रक्कम एटीएमद्वारे काढताना आरोपी सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्याच्या आधारावर त्याला नुकतीच दिल्लीतून अटक करण्यात आली. याप्रकरणी खात्यात रक्कम जमा झालेल्या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

बँक खात्यातून एक कोटी ४८ लाख रुपये हस्तांतरित झाल्याची तक्रार खातेधारकाच्या वतीने बँक ऑफ कुवेत आणि बहारीनकडे करण्यात आली होती. १४ ऑगस्टला करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर बँकेने अंतर्गत तपासणी केली असता या खात्यासह आणखी काही खात्यांतून रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. एकूण तीन खात्यांतून सुमारे पाच कोटी ४३ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे उघड झाले. त्यातील दोन खातेधारक बँकेतीलच होते. त्यानंतर बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष देव रामराजगिरी नारायण यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार दक्षिण विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गरजूंचा वापर

फसवणूक करून बँक खात्यातून काढलेली रक्कम दिल्ली, मध्य प्रदेश, आसाम आदी ठिकाणच्या व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. आसाममधील एका महिलेच्या बँक खात्यावर सहा लाख १२ हजार रुपये जमा झाले होते. आरोपीने तिच्याशी समाज माध्यमांवर मैत्री करून आपण परदेशातील डॉक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्लीत दवाखाना सुरू करायचा असल्याची बतावणी करीत आरोपीने या महिलेला बँक खाते उघडण्यास सांगितले होते. त्यानंतर ते बँक खाते एका मोबाइल क्रमांकाला जोडून सीमकार्ड आरोपीने दिल्लीला पाठवण्यास सांगितले. त्याशिवाय एका कामाच्या शोधात असलेल्या शिक्षकाच्या खात्यावरही रक्कम जमा करण्यात आली. त्याला त्यातील १० हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम आरोपींनी घेतल्याचे चौकशीत उघड झाले.