scorecardresearch

जे.जे. रुग्णालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया! २० कोटी खर्चाला तत्त्वत: मान्यता

जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनाही अद्ययावत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रोबाेटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

Robotic surgery in JJ hospital
जे.जे. रुग्णालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया! २० कोटी खर्चाला तत्त्वत: मान्यता (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मुंबई : किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी सध्या अनेक रुग्णालयांमध्ये रोबोचा वापर केला जातो. जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनाही अद्ययावत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रोबाेटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षामध्ये रोबो खरेदीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

फुफ्फुस, श्वसनमार्ग, लहान व मोठे आतडे, मूत्रपिंड, स्वादुपिंड, अन्ननलिका, पोट, शरीरात निर्माण होणाऱ्या कर्करोगाच्या गाठी काढण्यासाठी, तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी रोबोचा वापर केला जातो. त्यामुळे सामान्य शस्त्रक्रियेपासून कर्करोगापर्यंत बहुतांश शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते. जे. जे. रुग्णालयामध्ये अशा किचकट शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केल्या जातात. रुग्णांवर अधिक चांगल्या व सुलभ पद्धतीने शस्त्रक्रिया करता यावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने रोबो खरेदीची प्रक्रिया आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना सादर केला होता. यासाठी अंदाजे २० कोटी रुपये खर्च येणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर अगदी लहान चीर केली जाते. त्यामुळे रक्तस्त्राव आणि वेदना कमी होतात. रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्ण व डॉक्टरांसाठी फारच सोयीस्कर ठरत असल्याने जे.जे. रुग्णालयामध्ये रोबोच्या माध्यामातून शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

हेही वाचा – धक्कादायक! मुंबईत माथेफिरूचा शेजाऱ्यावर हल्ला, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

हेही वाचा – माहीमधील ‘त्या’ बांधकामावरील कारवाईनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “धर्मांध मुस्लिमांनी…”

रोबोटिक ऑपरेटिव्ह यंत्रणेद्वारे किचकट शस्त्रक्रिया सहजतेने पार पडू शकतात. या यंत्रणेद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठी ते फायदेशीर असून यामुळे वेळेची बचत होणार आहे, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 23:32 IST

संबंधित बातम्या