मुंबई: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती तसेच समुद्रकिनाऱ्यांवर मदत कार्य करणे अधिक सुलभ व्हावे तसेच प्राणहानी टळावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ ) यांच्याकडून सरकारकडे २२३ रिमोट कंट्रोल रोबोटिक वॉटर क्राफ्टची (स्वयंचलित बोटी) मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १२५ रोबोटिक वॉटर क्राफ्ट आपत्ती प्रतिसाद दलाला देण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. यासाठी २८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी जीवरक्षकांपेक्षा रोबोटिक वॉटर क्राफ्ट अधिक उपयुक्त ठरत असल्याचे समुद्र किनाऱ्यांवर तैनात करण्यात आलेल्या या स्वयंचलित बाेटींमुळे स्पष्ट झाले आहे. या धर्तीवर आता पावसाळ्यातील मदतकार्यासाठीही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रोबोटिक वॉटर क्राफ्टची मागणी करण्यात आली होती. हे वॉटर क्राफ्ट रिमोटद्वारे आपत्तीच्या ठिकाणी पोहोचवणे सहज शक्य होते. त्यचाप्रमाणे जीवरक्षकाला स्वत: तिथे न पोहोचता बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण या क्राफ्टच्या माध्यमातून शक्य होते. यासाठी २२३ स्वयंचलित बोटींची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १२५ बोटींना मंजुरी मिळाली आहे. या एका बोटीची किंमत २२ लाख ३५ हजार रुपये असून ही संपूर्णत: भारतीय बनावटीची आहे. अशा १२५ बोटी घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुमारे २८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक सुरक्षित

पारंपरिक पद्धतीमध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जीवरक्षकाला स्वतः समुद्रात उतरावे लागत होते. अनेकदा, घाबरलेली बुडणारी व्यक्ती वाचवायला आलेल्या व्यक्तीला पकडते, ज्यामुळे वाचवणाऱ्याचा जीवही धोक्यात येतो आणि जीवितहानी वाढते. मात्र, या रोबोटिक वॉटर क्राफ्टमुळे वाचवणाऱ्या व्यक्तीला स्वतः पाण्यात न उतरता, रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत क्राफ्ट पाठवून तिला सुरक्षितपणे बाहेर काढता येणार आहे. बॅटरीवर चालणारी ही बोट पाण्यातील १ किलोमीटरपर्यंतचा पल्ला सहज गाठते. हिचा वेग ताशी २४ किमी असून दीड तास पूर्ण चार्ज केल्यानंतर १ तासांपर्यंत ती कार्यरत राहते. २०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असल्याने एका वेळी किमान ४ व्यक्तींना सोबत आणू शकते.