मुंबई : नवी मुंबई, डहाणू आणि रायगड या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेल्या रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. ही गाडी २० जुलैपासून रोहा येथून दररोज दुपारी ४.३० ऐवजी दुपारी ३.५५ वाजता सुटेल आणि दिवा येथे सायंकाळी ७.२५ ऐवजी सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत ३० सप्टेंबर २०२३ मध्ये बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यानुसार काही रेल्वेगाड्या ऑक्टोबर २०२३ पासून नव्या वेळेनुसार धावण्यास सुरुवात झाली. तर, गाडी क्रमांक ०१३४८ रोहा - दिवा मेमू दुपारी ४.१५ ऐवजी दुपारी ४.३० वाजता चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १ नोव्हेंबर २०२३ पासून सुधारित वेळेत रोहा-दिवा मेमू धावत होती. मात्र, सुधारित वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत होती. ही मेमू सतत पनवेल येथे उशिराने पोहचत असल्याने तेथील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी विलंब होत असे. तसेच पनवेलवरून डहाणूकडे जाणारी मेमू देखील प्रवाशांना पकडता येत नव्हती. त्यामुळे रोहा-दिवा मेमूची वेळ ही पूर्वीप्रमाणे दुपारी ४ वाजता करण्यात यावी, अशी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानंतर, प्रवाशांची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्य करून २० जुलैपासून रोहावरून ही मेमू दुपारी ३.५५ वाजता सुटेल. तर, दिवा येथे सायंकाळी ७.२५ ऐवजी सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल.