मुंबई : पवईच्या आर.ए. स्टुडियोमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याने एकट्यानेच या नाट्याची संहिता लिहिली होती. त्याच्या सहकाऱ्यांना अंधारात ठेवून त्याने हा प्रकार केला. शेवटपर्यंत त्याने आपल्या मनात काय सुरू आहे याचा थांगपत्ताही लागू दिला नव्हात. रोहित आर्याचा सहकारी आणि या घटनेचा प्रत्यक्ष साक्षिदार रोहन आहेरने मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. त्यात तो जखमी झाला.

रोहित आर्या (५०) याचा सहकारी आणि प्रॉडक्शन मॅनेजर रोहन आहेर हा या संपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे. तो २०१३ पासून रोहित आर्यासोबत काम करतो. त्यांचे दोन चित्रपट एकत्र आले होते. सुमारे ३ महिन्यांपूर्वी रोहित आर्याने रोहनला ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाबाबत कळवले होते. त्यांच्या कामासंदर्भात बैठका झाल्या होत्या. आर्यासोबत पूर्वी काम केल्याने त्याच्यावर विश्वास होता. आर्यानेच मुलांच्या मुलाखतीची (ऑडीशनची) व्यवस्था, स्टुडियोची निवड, लघुपटाचे कथानक तयार केले. प्रत्यक्ष या मागे मुलांना ओलीस ठेवण्याची संहिता त्याच्या मनात शिजत होती. आर्याने आम्हाला २३-२४ मुलांची निवड करायला सांगितली होती. या काळात अनेक नामवंत कलावंत स्टुडियोत भेट द्यायला येत होते, मुलांना भेटत होते. सारे काही सुरळीत सुरू होते, असे रोहन आहेर याने सांगितले.

ओलीस नाट्याला सुरुवात

मुलांच्या मुलाखती २९ ऑक्टोबर रोजी संपल्या होत्या. आर्याने अजून एक दिवस वाढवला. मुलांना अधिक तपशिलात शिकवू असे सांगितले. स्टुडियो मालकाला सांगून एक दिवसांचा मुदत मागितली. त्याच्या लघुपटात दिवसाच्या पाळणाघरातील (डे-केअर) मुले भ्रष्टाचाराविरोधात क्रांती करतात आणि त्यासाठी एक गुन्हेगारी दृश्य असल्याचे सांगितले. त्याने रोहनला ५ लिटर पेट्रोल, फटाके आणालयला सांगितले होते. मात्र जिथे मुले असतात तिथे ज्वलनशील पदार्थ नेले जात नसल्याने कुणीच पेट्रोल नेले नव्हते. त्यामुळे तात्पुरती आग लावण्यासाठी रबर सोल्युशन आणण्यात आले होते. ३० ऑक्टोबर रोजी कोणत्याही व्यक्तीला वर जाण्यास बंदी घातली होती.

मुलांच्या सुटकेसाठी रोहनचे प्रयत्न

रोहन आहेरने नेमकी घटना कशी घडली त्याची माहिती दिली. मी वर गेलो तेव्हा रबर सोल्यूनश खाली होते आणि आर्याच्या हातात लायटर होते. त्याने स्टुडियोला आग लावायची धमकी दिली. २ ते ३ वेळा एअर गनही दाखवली, त्याच्या समोर मुले होती. या काळात आर्या सतत फोनवर पोलिसांशी बोलत होता, असे रोहन म्हणाला. पोलिसांनी रोहनला पुढे जायला सांगितले. रोहनने हातोडा शोधला आणि दरवाज्याची काच फोडली. पण आर्याने त्याच्यावर पेपर स्प्रे मारला. त्यामुळे रोहनचे डोळे चुरचुरायला लागले आणि तो जिन्यावरून खाली पडला. रोहनने मुलांना पळायला सांगितले. या धावपळीत तिथे असलेल्या पाटणकर नावाच्या वृध्द महिलेला दुखापत झाली. या काळात रोहनने पुण्यातील परियचाचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काहीही साध्य झाले नाही.

रोहित आर्यानी संयम बाळगायला हवा होता. मुलांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा होता, असे रोहनने सांगितले. मी मुलांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केले, त्यात यशस्वी ठरलो याचे समाधान आहे. घडलेली घटना दु:खद होती त्याचे शल्य कायम मनात राहील, असेही रोहनने सांगितले.