मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाल्यानंतर संबंधित ‘व्हीआरएस’ कंपनीवर काेणतीही कारवाई झाली नाही, उलट राज्य सरकारने पाच टप्प्यात कंपनीला ८३ कोटी रुपयांचे देयक अदा केले. विमान अपघातासंदर्भात राज्यात गुन्हा नोंद करुन घेतली नाही. अखेर कर्नाटकातील बेंगळुरुमध्ये गुन्हा नाेंदवून घेण्यात आला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

अजित पवार यांचा विमान अपघात झाला त्या व्हीआरएस कंपनीच्या मालकास जराही कारवाईची भीती नाही. व्हीआरएस कंपनी राज्य सरकारला जुनी विमाने पुरवते. राज्य सरकारने उत्तम विमानांसाठी निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये व्हीआरएस अपात्र ठरली होती, तेव्हा कंपनीच्या मालकाने थयथयाट केला होता, असा दावा आमदार पवार यांनी केला.

भारतीय न्याय संहितेप्रमाणे देशात कुठेही ‘शून्य’ गुन्हा नोंद करता येतो. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मी मुंबईत गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो, पण पोलीसांनी मला बारामतीला पाठवले. बारामती पोलिसांनी पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठवले. गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा नोंद केला नाही. अखेर मी कर्नाटकातील बंगळुरु मधील शेषाद्रीपुरम परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये २३ मार्च रोजी बारामतीच्या विमान अपघातची तक्रार नोंदवली, अशी माहिती आमदार पवार यांनी दिली.

या सभागृहातील किमान शंभर आमदारांना अजित पवार यांनी येथे निवडून येण्यासाठी मदत केली. पण, दादांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात विरोधकांनी आणलेल्या प्रस्तावावर बोलण्यास त्यांच्या पक्षातील चेतन तुपे वगळता एकही नेता धजावला नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. या आमदारांना निधी मिळणार नाही, अशी भीती वाटते आहे. काही पक्षांनी तर अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीच्या चर्चैत भाग घेऊ नका, असे आदेश त्यांच्या आमदारांना दिले होते, असा आरोप पवार यांनी केला.

सुनेत्रा पवार यांना कानपिचक्या :

अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्रीय तपास संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. ही मागणी पूर्णत्वास नेण्याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री या नात्याने सुनेत्रा पवारांना करायचा आहे. व्हीआरएस कंपनीच्या विमान अपघातांमध्ये अजित पवार गेले, त्याच कंपनीच्या विमानांमध्ये सुनेत्रा पवार दौरे करत आहेत. त्यामुळे कंपनीचा आत्मविश्वास दुणावला आहे, या शब्दात रोहीत पवार यांनी सुनेत्रा पवार यांना कानपिचक्या दिल्या.