मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा होता. पवार यांच्या निधनानंतर अध्यक्षांचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना देण्याबाबतचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर १८ व्या दिवशी, १६ फेब्रुवारीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये पक्षाच्या संविधानात बदल केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. या तिघांनी दिलेल्या पत्रात, पक्षाचे सर्वाधिकार हे कार्याध्यक्षांना देण्याची मागणी करण्यात आली होती. विद्यमान अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना या पत्राची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी १० मार्चला निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात अजित पवार यांचा अपघात झालेल्या २८ जानेवारीपासून ते आपण स्वतः अध्यक्ष होईपर्यंत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला गेला, तो ग्राह्य धरु नये, अशी मागणी केली आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या बारामती येथील घरामागे काळीजादू करण्यात आली होती. मुंबईतील देवगिरी बंगल्याच्या बाहेरही काळी जादू करण्यात आली होती. ज्यांच्या करंगळीला कुठेतरी कापले आहे, अंगठ्याला कापले आहे. या काळ्या जादूमध्ये कोण कोण अडकले आहे, असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.