मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे सत्ताधारी अजित पवार गटात विलिनीकरणास आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहभागाला ज्या नेत्यांचा विरोध होता, त्यांनी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवून आणला, असा आमचा संशय आहे, अशी सुस्पष्ट भूमिका शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित करून घातपाताचा संशय व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही एकत्रपणे सामोरे गेलो. विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आम्ही एनडीए सोबत सत्तेत जाणार होतो, हे काही लोकांना आवडत नसावे. तसेच अजित पवार सत्तेतून बाहेर पडून सामान्यांची लढाई लढतील, अशा शक्यता मान्य नसणाऱ्यांनी हा घातपात घडवून आणला, असे म्हणता येईल.

अपघातग्रस्त विमानात अतिरिक्त इंधन भरले गेले. शिवाय इंधन भरलेले कॅन ठेवले गेले. पायलट सुमित कपूरला काही कौटुंबिक अडचणी होत्या. त्यांना अनेक वर्षे नोकरी नव्हती. त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल करून विमानाचा अपघात घडवून आणला, असा संशय बळावला आहे. मी घातपात असल्याचे सांगितल्यानंतर भाजपचे लोकं मला विरोध का करत आहेत. त्यांचे ट्रोलर मला ट्रोल करतात, त्यामुळे शंका वाढते. सुमित ठक्कर यांना अपघातापूर्वी दोन दिवस अगोदर राज्यात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे ट्विट केले होते. त्याचा मुळाशी जाणार आहोत, असेही पवार म्हणाले.

डीजीसीएच्या तपासावर शंका

विमानाचा ब्लॅक बॉक्स जळल्याचे डीजीसीएकडून सांगितले जात आहे. पण, १,१०० अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाला काही प्रमाणात खराब होणारा ब्लॅक बॉक्स जळाला कसा. विमानातील कागद जळाले नाहीत. तांब्याच्या केबल जाळाल्या नाहीत. ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटी कडील भागात असतो, तो भाग सुरक्षित असताना ब्लॅक बॉक्स कसा जळाला.

अगोदर नोंदणी करून विमान घ्यावे लागते. पण, व्हीएसआर विमान घेतले २०२१ ला आणि एअर वर्दीनेसवर नोंदणी केले २०२२ ला. या विमानाला ५ हजार तास उड्डाणाचा परवाना होता. उड्डाणाचे ४९१५ तास झाले होते, ८५ तास बाकी होते. तरीही झेड सुरक्षा असलेल्या अजित पवार यांना घेऊन विमानाने उड्डाण कसे केले. भारताच्या बाहेरून येणाऱ्या, विकत घेणाऱ्या विमानांची नोंदणी होते. लेअर जेट या विमानाची देशात नोंदणीच होत नाही. डीजीएसने बेकायदा या विमानांची नोंदणी केली आहे. त्यामुळे डीजीसीएकडून होणाऱ्या तपासावर आम्हाला शंका आहे, असेही पवार म्हणाले.
व्हीएसआर कंपनीला वाचविण्याचे प्रयत्न

विमान अपघात झाल्यानंतर लगेचच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी या प्रकरणात कंपनीची काहीच चूक नसल्याचे म्हटले होते. आता अनेक गंभीर त्रुटी समोर येत आहेत. चौकशी न करता कंपनीचा मालक रोहित सिंह अमेरिकेत कसा गेला. डीजीसीएच्या चौकशी समितीत अपूर्वा अग्रवाल यांचा समावेश करून कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. डीजीसीएत काम करणाऱ्या श्वेता सिंग सर्व तपास नियंत्रित करीत आहेत. त्यांना तपास पूर्ण होईपर्यंत डीजीसीएपासून दूर ठेवावे.

सीआयडीचा अहवाल १५ फेब्रुवारी अहवाल येणे अपेक्षित होते. पण, अहवाल का आला नाही, असेही पवार म्हणाले. सीआयडी, डीजीसीएसह अन्य दोन परदेशी संस्थांकडून तपास करावा. सर्व तपास यंत्रणावर देखरेख करणारी समिती नेमावी. या समितीत संसदेतील विरोधी पक्ष नेते, विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ, पवार कुटुंबातील एक व्यक्ती, निवृत्त न्यायाधिशांचा समावेश व्हावा. अॅरो आणि व्हीएसआर कंपनीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.