मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांचा पोलिसांशी वाद झाला. पोलिसांनी डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करुन घ्यायला नकार दिल्यामुळे शाब्दिक चकमक झाली. पवार उद्या, गुरुवारी बारामती येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणार आहेत.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार सातत्याने शंका व्यक्त करीत आहे. हा अपघात नाही, घातपात असल्याचा आरोप करीत आहे. मंगळवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) अपघातग्रस्त व्हीएसआर कंपनीच्या पाच विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. त्यामुळे पवार यांच्या आरोपाची धार वाढली आहे. आमदार रोहित पवार, संदीप क्षीरसागर, अमोल मिटकरी, इद्रिस नायकवडींसह पदाधिकारी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे रोहित पवारांसह अन्य लोकप्रतिनिधींचा पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्याशी वाद झाला.

दरम्यान रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या वकिलांनी त्यांनी नवा पीएनएस कायदा समजावून सांगितल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी लॅपटॉप आणला. माझा जबाब टाईप करायला सुरुवात झाली होती. इतक्यात पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे त्या ठिकाणी आले. त्यांनी एफआयआर दाखल करुन घेणार नाही, असे सांगितल्यानंतर वाद वाढला.

वाद वाढत गेल्यानंतर प्रवीण मुंडे म्हणाले, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही. ज्याला सांगायचे आहे, त्याला सांगा, जिथे जायचे आहे, तिकडे जा, जी कारवाई करायची आहे, ती करा. पण आम्ही तक्रार नोंदवू शकत नाही. मुंढे यांच्या हा भूमिकेनंतर वाद वाढला. अखेरीस रोहित पवार यांनी गुरुवारी बारामती येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले आहे.