गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच रोहित पवार हे पक्षात नाराज असल्याचेदेखील बोललं जातं आहे. दरम्यान, या चर्चांवर आता स्वत: रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – अजित पवार गटाचे आमदार संपर्कात आहेत का? रोहित पवार म्हणाले, “एकदा अधिवेशन होऊद्या…”

नेमकं म्हणाले रोहित पवार?

“मी एखाद्या वेळी नाराज झालो आणि कुठतरी जाऊन दरवाजा बंद करुन बसलो, असं कधी दिसणार नाही. माझ्या स्वभावानुसार माझ्या मनात जे असतं, ते मी बोलून दाखवतो. नगरला जे झालं त्यावेळी मी कोणत्या एका नेत्यावर टीका केली नव्हती. मी पक्षाच्या भूमिकेवर आणि पक्षातील त्रृटींवर बोललो होते. ती माझी एकट्याची भूमिका नव्हती. मी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका तिथे बोलून दाखवली होती”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

जयंत पाटलांशी मतभेत असल्याच्या चर्चांवर म्हणाले…

पुढे बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चांवरही भाष्य केलं. “माझ्या आणि जयंत पाटलांच्या संदर्भात माध्यमात काही बातम्या आल्या. मात्र, त्याठिकाणी माझं आणि जयंत पाटील यांचे भाषण ऐकलं, तर आम्ही दोघांनीही एकच एक भूमिका मांडली होती. हा विजय कोण्या एकट्याचा नसून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचा आहे, असं आम्ही सांगितलं होतं, त्यामुळे लोकसभेतील यश हे सर्वसामान्य लोकांचं असून कोणा एकट्याचं नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “अजित पवारांचं कुटुंब आता वेगळं”, घराणेशाहीवरील टिकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचं विधान

“प्रदेशाध्यक्ष पदाबाबत इच्छुक नाही”, स्पष्ट केली भूमिका

यावेळी बोलताना आपण प्रदेशाध्यक्ष पदाबाबत इच्छुक नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. “गेल्या सात वर्षांपासून मी काम करतो आहे. हे काम करताना कार्यकर्ते पदाधिकारी काही भूमिका मांडतात. तेव्हा लवकर निर्यण घेणं महत्वाचं असतं, अनेकांना पक्षांसोबत येण्याची इच्छा असते. परंतु, माझ्याकडे कोणतही पद नसल्याने मला निर्णय घेता येत नाही. ही भूमिका आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडली आहे. शिवाय जयंत पाटील सुप्रिया सुळे हे माझ्या पदाबाबत जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. भविष्यात कोणतीही जबाबदारी मिळाल्यास मी तयार आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.