मुंबई : अजित पवार गटातील चार नेते सत्तेसाठी, पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपडत आहेत. त्या चार नेत्यांनी किमान एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न करावेत. अजित पवार यांना न्याय मिळवून देण्याऐवजी ते चार नेते सत्तेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अपघात प्रकरणी माझ्याकडे असलेले सर्व पुरावे त्यांना देऊन सखोल चौकशीची मागणी केली, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार यांनी शुक्रवारी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आपल्याकडील सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन सखोल चौकशीची मागणी केली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर पक्ष बळकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
अजित पवार गटातील चार नेते सत्तेसाठी, पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड करीत होते. पण, आमदार, पदाधिकारी आणि लोकांच्या दबावामुळे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली गेली. इच्छा नसताना त्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असतानाही त्याच्याच अपघात प्रकरणाची पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीत. त्या नेत्यांनी पक्ष बळकविण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी किमान तक्रार दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशीची मागणी केली. माझ्या शंका, संशय मी मुख्यमंत्र्यांना सांगितला. माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध झाली आहे, ती सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आणखी काही कागदपत्रे त्यांना देणार आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. चौकशीत पारदर्शकता यावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. दिल्लीत शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीची ग्वाही
देवगिरी बंगल्यावर दादाचे स्मारक करावे. विधीमंडळाच्या आवारात स्मारक उभारावे. बारामती विमानतळ, पुणे रिंग रोड, प्रस्तावित तळेगाव – चाकण – शिक्रापूर इलेव्हेटेड रस्ता आणि पुणे – शिरूर इलेव्हेटेड रस्त्याला अजित पवार यांचे नाव द्यावे. अपघातातील विदीप जाधव यांच्या पत्नीला ठाणे महानगर पालिकेत पूर्णवेळ नोकरी द्यावी. पिंकी माली यांच्या भावाला चांगल्या पगाराची नोकरी द्यावी. को – पायलट पाठक यांच्या कुटुंबाची एक मागणी पूर्ण करावी, अशी मागणीही फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती पवार यांनी दिली.
तांत्रिक बाबी तपासून एफआयआरचा निर्णय
पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एफआयआर प्रकरणी तांत्रिक बाबी समजून घेऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. डीजीसीए – व्हीएसआरचे संबंध असल्यामुळे व्हीएसआरला वाचविण्याचे प्रयत्न करू नका. अॅरो कंपनीवर कारवाई करा, अशीही मागणी केली आहे. आमचा लढा राजकीय नाही, अजित पवार यांना न्याय देण्यासाठी आम्ही लढा लढत आहोत. आमच्यापेक्षा सरकारने हा लढावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. डीजीसीएचा अहवाल उद्यापर्यंत येणे अपेक्षित आहे. आम्हाला सविस्तर अहवाल पाहिजे. थातुरमातूर अहवाल नको आहे, असेही पवार म्हणाले.
