मुंबई : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील (डीजीसीए) अधिकारी फैज अहमद किदवई यांची बदली झाली असून, त्यांच्या बदलीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
या बाबत रोहित पवार यांनी समाज माध्यमात एक संदेश प्रसारित केला असून, त्यात म्हटले आहे, कुठल्याही दबावाला बळी न पडणारे आणि प्रामाणिक अधिकारी डीजीसीएमध्ये बोटावर मोजण्याएवढेच आहेत. त्यामध्ये फैज अहमद किदवई यांचा समावेश होतो. दुसरीकडे व्हीएसआर सारख्या बोगस कंपन्यांना पायघड्या घालणारे मनीष कुमार, श्वेता सिंग यांच्या सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची डीजीसीएमध्ये अजिबात कमतरता नाही. विमान मंत्र्यांचा विरोध डावलून स्पेशल ऑडिटच्या माध्यमातून व्हीएसआरच्या चार लेअरजेट विमानांना उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्याचा निर्णय किदवई यांनी घेतला होता, असे पवार यांनी म्हटले आहे.
व्हीएसआरला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत, पण, दुसरीकडे मात्र मंत्र्यांचे न ऐकणारे, व्हीएसआरला न जुमानणारे किदवई यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होते हे दुर्दैवच म्हणावे लागेल, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
