मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी विमान अपघात तपास विभागाने (एएआयबी) सादर केलेला प्राथमिक चौकशी अहवाल दिशाहीन आहे, केवळ रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न आहे. अपघाताचे पुरावे नष्ट करण्याचा, माहिती लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेखी झाली होती, असा गंभीर आरोप करून अपघाताची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी पुन्हा सविस्तर सादरीकरण करून गंभीर प्रश्न उपस्थित केले. अहवालात अनेक दोष आहेत. प्राथमिक चौकशी अहवालात बारामतीला ‘जिल्हा’ संबोधले आहे. बारामती महानगर पालिका, असा चुकीचा उल्लेख केला आहे. विमान झाडाला धडकले. विमान डावीकडे झुकले होते, असे म्हटले आहे. पण, धावपट्टीशेजारी मोठे झाड नाही, प्रत्यक्षदर्शींनाही असे काहीच दिसले नाही. त्यामुळे वस्तुस्थितीपेक्षा काहीतरी वेगळेच दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.

विमानाच्या तांत्रिक बाबींकडे लक्ष वेधताना अंडर लॉगिंगचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. अधिकृत नोंदीनुसार इंजिनचे ३००० तास शिल्लक असल्याचे भासवले गेले, मात्र प्रत्यक्षात हे इंजिन ८००० तासांहून अधिक काळ वापरले गेले होते. इंजिनची क्षमता संपलेली असतानाही ते विमान मुद्दाम अजित पवारांना दिले गेले का ? उच्च तापमानामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्यामुळे अपघाताविषयी माहिती मिळाली नाही, असे सांगितले जाते. मात्र, ती माहिती सुरक्षित आहे, जाणीवपूर्वक बाहेर आणली जात नाही, असा आरोपही पवार यांनी केला.

व्हीएसआर कंपनीत काळा पैसा

अपघातग्रस्त विमान कंपनी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर गंभीर आक्षेप पवार यांनी घेतले आहेत. कोलकाता येथील २७ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून ८६८ कोटी रुपये व्हीएसआर कंपनीत वळवण्यात आले. यातील १५ ते १६ कंपन्या व्यवहार झाल्यानंतर तातडीने बंद करण्यात आल्या. हा सर्व पैसा काळा असल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला. या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचे संबंध थेट दिल्लीतील बड्या नेत्यांशी आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी आहेत, असा आरोपही पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा बेकायदा ?

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये दावोस दौरा केला होता. परवानगी न घेताच व्हीएसआर कंपनीचे विमान उड्डाण करीत होते. परवानगी नसल्यामुळे विमान इराण, इराकच्या हवाई हद्दीत गेल्यावर विमान माघारी वळवावे अन्यथा विमान पाडले जाईल, असा इशारा दिला गेला. त्यामुळे विमान बहरीनमध्ये उतरविण्यात आले, त्यानंतर पुढील परवानगी घेतल्यानंतर विमान पुन्हा दावोस गेले, या प्रकाराबाबत एकनाथ शिंदे अधिक माहिती देऊ शकतील, असेही रोहित पवार म्हणाले.

व्हीएसआरचा देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न

विमान अपघात आणि पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केल्यामुळे व्हीएसआर कंपनी आपली विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. हैदराबादला असलेले लेगसी ६०० हे विमान आता सॅन मारिनो (युएसए) ला ट्रान्सफर करण्यात आले आहे. धंदा सुद्धा तिकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तुम्ही चोर नसाल तर घाबरता कशाला. पण, तुम्ही चोर आहात म्हणून तुम्ही घाबरून देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहात, असा आरोपही पवार यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

विमानाचे सुरक्षित लँडिंग धावपट्टी क्रमांक २९ वर होणे शक्य असतानाही मुद्दाम ११ क्रमांकाच्या धावपट्टीवर करण्याचा वैमानिकाने का केला.
दृश्यमानता कमी असतानाही विमान उड्डाण आणि विमान उतरविण्याची बेकायदा परवानगी का देण्यात आली.
विमान कंपनी आणि डीजीसीए अधिकाऱ्यांमधील लागेबांधे आहेत, त्याची चौकशी व्हावी.