मुंबई : घराच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पातून गरजेपेक्षा अधिक वीज तयार झाल्यास ती अन्य ग्राहकाला विकता यावी, यासाठी ‘पीअर टू पीअर’ (पी२पी) पद्धती प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे संकेत ‘महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा’ने दिले आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही व्यवस्था राबवण्याचा विचार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. त्यामुळे, सर्वसामान्य ग्राहकांना स्वस्त आणि शाश्वत ऊर्जेचा एक नवा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका आदेशात आयोगाने या संकल्पनेची मर्यादित स्वरूपात चाचणी घेण्याचा पर्याय सुचविला. त्यावर ‘अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी आणि पंप्ड स्टोरेजसोबतच, पी२पी हा वीज विक्रीचा एक प्रभावी आणि भविष्यातील अनिवार्य पर्याय ठरेल,’ असे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्राची एकूण स्थापित सौर ऊर्जा क्षमता २० हजार मेगावॉटवर पोहोचली आहे. यातील घरांच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता सात हजार मेगावॉटच्या पुढे आहे. अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जा साठवून नंतर वापरता यावी, याकरिता सध्या बॅटरी आणि पंप्ड स्टोरेजच्या पर्यायांचा विचार होतो. पी२पी तत्त्वात अतिरिक्त ऊर्जा त्याचवेळी अन्य ग्राहकापर्यंत पोहोचवून त्याची विक्री होते. त्यामुळे हाही पर्याय येत्या काळात अवलंबवावा लागेल, अशी प्रतिक्रिया लोकेश चंद्र यांनी दिली. अर्थात आयोगाच्या आदेशामुळे ग्राहकांना तातडीने वीज विक्रीची परवानगी मिळालेली नाही. या करिता स्वतंत्र नियमावली आणि प्रायोगिक व्यवस्था तयार करावी लागणार आहे.

सध्या अतिरिक्त सौर ऊर्जा वितरण कंपनीच्या जाळ्यात पाठविली जाते. ग्राहकाने कंपनीकडून घेतलेली वीज आणि जाळ्यात पाठविलेली वीज यांचा हिशेब ‘नेट मीटरिंग’द्वारे केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने महिन्यात १०० युनिट अतिरिक्त वीज जाळ्यात पाठविली आणि रात्री कंपनीकडून १५० युनिट वीज घेतली, तर नियमांनुसार समायोजन करून उर्वरित विजेचे देयक आकारले जाते. यात ग्राहकाचा वीज व्यवहार वितरण कंपनीशीच असतो. अतिरिक्त वीज दुसऱ्या ग्राहकाला विकण्याची मुभा नाही.

पी२पी व्यवस्थेत मात्र एका घराच्या छतावरील सौरप्रकल्पातून तयार झालेली अतिरिक्त वीज दुसऱ्या ग्राहकाला विकता येईल. उदाहरणार्थ, एका ग्राहकाकडे दिवसा १०० युनिट अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि दुसऱ्या ग्राहकाला त्याच वेळी तेवढ्याच विजेची गरज असल्यास ती भागवता येईल. अर्थात दोन्ही ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या जाळ्यातूनच वीज मिळेल. मात्र विक्री-खरेदीचा व्यवहार ग्राहकांमध्ये होईल.

अमरावतीतील मनोज शेंडुरकर यांनी याच संदर्भात ९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यांच्या घरावर पाच किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प असून, अतिरिक्त वीज अन्य ग्राहकांना विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होती. ग्रीनकॅशएक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तंत्रज्ञान मंचाच्या माध्यमातून असे व्यवहार करता येऊ शकतात, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.

सध्याच्या नेट मीटरिंग व्यवस्थेत आर्थिक वर्षात अतिरिक्त सौर ऊर्जा पुढील कालावधीसाठी वापरता येत नसल्याने तिचे आर्थिक मूल्य मिळत नाही. थोडक्यात, ग्राहकांना अतिरिक्त वीज विकण्यासाठी स्वतंत्र बाजारव्यवस्था उपलब्ध नसल्याचा त्यांचा आक्षेप होता. तंत्रज्ञान मंचाच्या माध्यमातून वीजेचे मोजमाप, व्यवहारांचा हिशेब आणि आर्थिक समायोजन करता येऊ शकते, असा त्यांचा दावा होता. यानुसार पी२पी व्यवहारांसाठी तंत्रज्ञान मंचाला मान्यता द्यावी, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था राबवावी आणि त्यासाठी विद्यमान नियमांमध्ये आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी त्यांनी २०२४ मध्ये आयोगाने पी२पीबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेच्या आधारे केली होती.

मागील सुनावणीत आयोगाने राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. मात्र याचिकेची प्रत मिळूनही त्यांच्याकडून उत्तर आले नाही. अखेर आयोगाने प्रायोगिक चाचणीची आयोगाची भूमिका मांडत याचिका निकाली काढली.

प्रायोगिक चाचणीची आयोगाची सूचना

पी२पी व्यवहारांची संकल्पना नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविणे, विकेंद्रित वीज निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि अतिरिक्त सौरऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर करणे या उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. मात्र, दोन ग्राहकांमधील परस्पर करार किंवा खासगी तंत्रज्ञान मंचाच्या आधारे अशा व्यवहारांना परवानगी देता येणार नाही, असेही स्पष्ट केले. पी२पी व्यवहारांसाठी मीटरमधील माहितीचे अचूक मोजमाप, व्यवहारांचा हिशोब, देयकांचे समायोजन, वितरण कंपनीच्या जाळ्याच्या वापराचे शुल्क आणि सायबर सुरक्षा यांसारख्या बाबी निश्चित कराव्या लागतील. त्यामुळे आयोगाने ‘रेग्युलेटरी सँडबॉक्स’ म्हणजेच मर्यादित ग्राहक आणि ठरावीक क्षेत्रात नियंत्रित प्रायोगिक चाचणी घेण्याचा पर्याय सुचविला आहे. या चाचणीतून तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासता येईल. त्याबाबत स्वतंत्र नियमावली आणि प्रायोगिक योजना तयार झाल्यानंतरच ग्राहकांना अतिरिक्त सौरवीज विकण्याचा पर्याय प्रत्यक्ष उपलब्ध होऊ शकेल.

सूचनेचे सावधपणे स्वागत

आयोगाच्या सूचनेवर सावध प्रतिक्रिया देताना वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे म्हणाले की, सौरऊर्जा अखंडपणे उपलब्ध आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्यासच हा पर्याय वीज निर्माता आणि ग्राहक यांच्याकरिता उपयुक्त ठरू शकतो. सध्या आपल्याकडे तितकीही अतिरिक्त सौर ऊर्जा निर्माण होत नाही आहे. भविष्यात त्याकरिता वीज वितरणाचे जाळे विकसित करण्याबरोबरच मागणी-पुरवठ्याचे गणित जुळवावे लागेल. त्यामुळे आयोगाच्या सूचनेनुसार हा विचार सध्या प्रायोगिक तत्त्वावरच करायला हवा. तेही सलग तीन-चार वर्षे केल्यानंतर त्याबाबत निश्चित धोरण व नियमावली करता येईल. वीज क्षेत्रातील आणखी एका तज्ज्ञाच्या मते मात्र तांत्रिकदृष्ट्या हा पर्याय व्यवहार्य ठरू शकतो. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्याकरिता अशा प्रयोगाचा सार्वत्रिक स्वीकार करता येईल. अर्थात आधी तो प्रायोगिक तत्त्वावरच राबवायला हवा.