पावसाळ्यापूर्वी मिठी नदीमधील गाळ काढण्यावरुन पालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मध्ये वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
एमएमआरडीएच्या अखत्यारितील मिठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्याचे काम महापालिकेकडे सोपवले आहे. मात्र एमएमआरडीएने पैसे दिल्यास गाळ काढण्यात येईल, असा पवित्रा घेऊन प्रशासनाने याबाबत सादर केलेला प्रस्ताव स्थायी समितीने शनिवारी राखून ठेवला. सभागृह व स्थायी समितीला विश्वासात न घेता असे निर्णय प्रशासनाने परस्पर घेऊ नयेत, असे खडे बोल स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला सुनावले. या वादामध्ये मिठी नदी यंदा गाळातच अडकण्याची शक्यता आहे.
मिठी नदीची एकूण लांबी १७.८ कि.मी आहे. यंदा एमएमआरडीएच्या अखत्यारितील ४.६ कि.मी. लांबीच्या नदीतील गाळ उपसण्याचे काम पालिकेवर सोपविले आहे. पालिकेने ते करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र  मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम पालिकेच्या माथी मारण्यात येत आहे. पालिका प्रशासन परस्पर असे निर्णय घेत असून ते खपवून घेतले जाणार नाहीत. एमएमआरडीएने पैसे दिले तरच पालिकेतर्फे मिठी नदीतील गाळ काढण्यात येईल, असे स्पष्ट करीत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला. तसेच मिठी नदीची जबाबदारी मिठी नदी प्राधिकरणाची असून लवकरच प्राधिकरणासोबत बैठक आयोजित करावी, असे ते म्हणाले.