‘महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन’ दाद मागणार
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळुकर हे प्राध्यापक तर सोडाच, पण त्याहून निम्न पद असलेले सहयोगी प्राध्यापकही नव्हते; परंतु कुलगुरू म्हणून निवृत्ती घेऊन ते आपोआपच प्राध्यापक या वरिष्ठ पदासाठीच्या निवृत्तिवेतनाकरिता पात्र ठरले आहेत, असा आक्षेप घेत ‘महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन’ (मुप्टा) या प्राध्यापकांच्या संघटनेने याविरोधात तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे.
वेळुकर यांना अपात्र असतानाही वरिष्ठ पदासाठी देय असलेले अधिकचे निवृत्तिवेतन मंजूर करणे हा करदात्यांच्या पैशाचा गैरवापर आहे, असे स्पष्ट करत मुप्टाचे अध्यक्ष अशोक बनसोड यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. आम्ही सरकारकडे तक्रार करूच, प्रसंगी न्यायालयातही दाद मागू, असे बनसोड यांनी स्पष्ट केले.
मुळात कुलगुरू पद भूषविणारी व्यक्ती ही प्राध्यापक किंवा प्राचार्य या सर्वोच्च पदावरच कार्यरत असते, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत कुलगुरूपद भूषविले आहे ते कार्यकाळ संपल्यानंतर मूळ संस्थेत रुजू होताना प्राध्यापक किंवा प्राचार्य म्हणूनच गेले. वेळुकर प्राध्यापक काय, तर सहयोगी प्राध्यापकही नव्हते. स्वेच्छानिवृत्ती घेतली नसती, तर मूळ संस्थेत साहाय्यक किंवा फार तर सहयोगी अध्यापक म्हणून रुजू होणारे वेळुकर हे बहुधा पहिले कुलगुरू ठरले असते; परंतु त्याऐवजी त्यांनी कुलगुरूपदावरून निवृत्त करा, अशी मागणी करत १ एप्रिल २०१५ला स्वेच्छानिवृत्तीकरिता ‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’कडे अर्ज केला. त्यांची मागणी २० जून २०१५ला मंजूर करतानाही सरकारने दिलेल्या पत्रावर ‘सहयोगी’ म्हणूनच उल्लेख केला आहे. (याची प्रत ‘लोकसत्ता’कडे) खरे तर तोही चुकीचाच आहे; परंतु या पत्रावर कुठेही ‘प्राध्यापक’ म्हणून सेवामुक्त केल्याचा उल्लेख नाही, याकडे बनसोड यांनी लक्ष वेधले.
कुलगुरू म्हणून निवृत्त होताना तुलनेने कनिष्ठ पदावर परत जाण्याची नामुश्की टाळण्याबरोबरच वरिष्ठ पदासाठीचे निवृत्तिवेतन पदरात पाडून घेऊन त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत; परंतु अशा पद्धतीने मागील दाराने वरिष्ठ पदासाठी देय असलेल्या निवृत्तिवेतनावर दावा करणे सर्वस्वी चुकीचे व नियमबाहय़ आहे. तसेच, यामुळे चुकीचा पायंडा पडणार आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होते आहे.

७५ हजार निवृत्तीवेतनावर दावा?
प्राध्यापकांच्या तुलनेत निम्न पदावरून निवृत्त झाले असते, तर वेळुकर यांना फार तर ३० ते ४० हजार इतकीच रक्कम निवृत्तिवेतन म्हणून मिळाली असती; परंतु आता ते तब्बल ७५ हजारांहून अधिक निवृत्तिवेतनावर दावा करू शकणार आहेत.