मुंबईकरांना नेहमीच भाडं नाकारणाऱ्या तसंच वाढीव भाडं मागणाऱ्या टॅक्सी चालकांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. भाडं नाकारत उद्धपटणे वागणारे टॅक्सीचालक मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा टॅक्सी चालकांना धडा शिकवत अटक केली आहे. आरपीएफने मुंबई सेंट्रलमध्ये कारवाई करत २२ टॅक्सीचालकांना अटक केली होती. आरपीएफने टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आरपीएफने अटक केलेल्या या टॅक्सी चालकांची नंतर रेल्वे दंडाधिकाऱ्यांडून सुटका करण्यात आली. सर्व टॅक्सी चालकांना ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला. आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “मीटरप्रमाणे तसंच प्री-पेड चार्टप्रमाणे जाण्यास नकार देणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात येणाऱ्या तक्रारींची आम्ही दखल घेत असून गांभीर्याने घेत आहोत’. अशी कारवाई शक्यतो पोलीस किंवा आरटीओकडून केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सोमवारी आरपीएफ निरीक्षकाकडे एका प्रवाशाने टॅक्सी चालकाची तक्रार केली होती. घाटकोपरला जाण्यासाठी टॅक्सी चालक ७०० रुपयांची मागणी करत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं होतं. यानंतर आरपीएफने मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर जास्तीचं भाडं मिळवण्याच्या प्रतिक्षेत गेट अडवणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.