मुंबई: वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही मुंबई महापालिका अधिकारी समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने रिपाईच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी दुपारी महापालिकेच्या एम पूर्व कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आणि त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
गेल्या काही वर्षांपासून रिपब्लिकन पार्टीचे (आनंदराज आंबेडकर गट) कार्यकर्ते विशाल मोरे परिसरातील एका खासगी शाळेबाबत, तसेच इतर स्थानिक प्रश्नांबाबत पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाकडे पत्रव्यवहार करत आहेत. मात्र पत्रव्यवहार केल्यानंतरही या समस्यांची दखलही घेण्यात येत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या मोरे यांनी पालिका कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता. मोरे यांनी मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास एम पूर्व कार्यालयाबाहेर स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र देवनार पोलीस आणि महापालिका सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना ताब्यात घेतले. देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

