हरीश राणाच्या इच्छामृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. हरीश राणाच्या इच्छामरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अशातच मुंबईतूनही अशीच एक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या ३५ वर्षीय आनंद दीक्षितचे आई वडीलांनी सांगितलं की आनंद गेल्या अडीच वर्षापासून वेजिटेटिव्ह स्टेट मध्ये आहे. हा अशा प्रकारचा कोमा आहे ज्यातून आनंद दीक्षित बाहेर येईल ही आशा संपली आहे.

२९ डिसेंबर २०२३ ला अपघात झाला आणि…

२९ डिसेंबर २०२४ ला आनंद त्याच्या स्कूटरवर स्वार होऊन चालला होता. आनंद तेव्हा गोरखपूरमध्ये होता. पण आनंदचा अपघात झाला. त्या अपघातातून वाचला पण तो जिवंतपणीच मरण यातना सहन करतो आहे. आनंद आता त्याचं आयुष्य मशीन आणि ट्युब्सच्या आधारे जगतो आहे. आनंद दीक्षित कोमात गेला आहे. आनंदचे केअरटेअकर अर्जुन प्रजापती म्हणाले की मागच्या दीड वर्षापासून आनंदच्या पापण्या फडकतील याची वाट बघतो आहे. मात्र तो शांतपणे पाहातो आहे बाकी काहीही नाही असंही त्यांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

हरीश राणाप्रमाणेच आनंद दीक्षित कोमात

हरीश राणाप्रमाणेच आनंद दीक्षितची अवस्था झाली आहे. मागील अडीच वर्षांपासून आनंद दीक्षित कोमामध्ये गेला आहे. आत्तापर्यंत त्याच्या उपचारांवर चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. एका अपघातामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याचा श्वासही मशीनद्वारे सुरु आहे.दीक्षित कुटुंबावर डिसेंबर २०२३ महिन्यापासून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंद दीक्षितवर कोकीलाबेन आणि लोटस या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर ५० लाखांचं कर्जही आनंदच्या आई वडिलांना घ्यावं लागलं आहे. आनंद जेव्हा रुग्णालयात होता तेव्हा त्यांच्या घरावर बुलडोझर चालला. तसंच आनंद दीक्षितचा जो मेडीक्लेम इन्शुरन्स कंपनीने नाकारला.

आनंदचे वडील काय म्हणाले?

आनंदचे आई वडील आता भाडे तत्त्वावर एका घरात राहतात. आनंदचे वडील म्हणाले आम्ही आर्थिकदृष्ट्या पूर्ण खचलो आहोत. तसंच आम्हाला आर्थिकदृष्ट्या लुटण्यात आलं आहे. मुलाचा उपचारांचा खर्च अफाट आहे. रुग्णालय ते इन्शुरन्स कंपनी सगळ्यांनीच आम्हाला नाडलं आहे. आम्ही कर्जाच्या विळख्यात अडकलो आहोत. आनंदच्या वडिलांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला तेव्हा सांगितलं की मला एकदा माझ्या मुलाकडून पापा ही हाक ऐकायची आहे. रुग्णालय असो किंवा इन्शुरन्स कंपनी कुणीही आम्हाला आधार दिला नाही. आता आमचे हाल होत आहेत. जर अशा प्रकारच्या आजारांमध्ये जे रुग्ण अडकले आहेत त्यांच्यासाठी वीमा, आरोग्यविषयक उपचार या सगळ्या गोष्टींचे नियम आणि कायदे बदलले नाहीत तर संपूर्ण कुटुंबालाच दयामरण देण्याची वेळ येईल असंही त्याच्या आई वडिलांनी बोलून दाखवलं आहे.