लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शाहू महाराज्यांच्या काळात बंगाल, ओडिसा, छत्तीसगड प्रांतात मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे शूर सेनापती पहिले रघुजी भोसले यांच्या तलवार खरेदीसाठी सरकार ६९ लाख ९४ हजार रुपये मोजणार आहे.
कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात पहिले रघुजी भोसले (१६९५-१७५५) हे शूर सेनापती होऊन गेले. त्यांचे शौर्य आणि कुशल युध्दनितीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहेबसुबा’ ही पदवी प्रदान केली होती. त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड, चांदा, संबलपूर या प्रदेशात केला होता. नागपूरच्या भोसले घरण्याची स्थापना त्यांनी केली आहे. ज्या तलवारीच्या जोरावर हा पराक्रम त्यांनी केला, ती तलवार १८१७ मध्ये सीताबुल्दीच्या लढाईत ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लुटीचा भाग म्हणून लंडनला नेली. लंडनमध्ये मागील महिन्यात झालेल्या लिलावात ही ऐतिहासिक तलवार प्रवीण चल्ला या ऐतिहासिक संग्राहकाने खरेदी केली.
चल्ला ही तलवार राज्य शासनाला देण्यास तयार आहेत. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला ६९ लाख ९४ हजार ४३७ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याची प्रशासकीय व वित्तीय मान्यता एका शासन आदेशाने देण्यात आली.
गेल्या वर्षी १७ जुलै रोजी माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानचा ज्या वाघनखांनी कोथळा बाहेर काढला, ती वाघनखे लंडनहून आणली. तीन वर्षे ही वाघनखे राज्यातील विविध वस्तू संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. त्यासाठी ७ कोटी रुपये खर्च करून वस्तू संग्रहालयांची डागडुजी करण्यात आली आहे.