ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातील सर्वोच्च सन्मानाने ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मराठी साहित्यविश्वातला हा चौथा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार. याआधी वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या तीन साहित्यिकांची आठवण आणि नेमाडेंचा गौरव करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या वतीने ‘मराठी ज्ञानपीठ गौरव सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ९५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्यासाठी सरकारने निविदा मागवल्या आहेत.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘निविदा मागवल्या आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याची आखणी करण्यात आली आहे.   या सोहळ्यात प्रा. भालचंद्र नेमाडे यांचा गौरव केला जाणार आहेच. त्याचबरोबर या आधी ज्या तीन साहित्यिकांना हा सर्वोच्च सन्मान मिळाला होता. त्यांनाही या निमित्ताने अभिवादन केले जावे, ही तावडे यांची या कार्यक्रमामागची संकल्पना आहे, असे दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकी संचालक संजय पाटील यांनी सांगितले.
या सोहळ्यासाठी एक खास व्यासपीठ तयार केले जाणार आहे. कार्यक्रमासाठी अनोखे संकल्पनाचित्र, पाच हजार लोकांची आसनव्यवस्था, सुरक्षाव्यवस्था, भव्य प्रकाशयोजना केली जाणार आहे. या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.

गौरव सोहळा भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. एकूण चार-पाच हजार मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्या पद्धतीनेच कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. -संजय पाटील, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकी संचालक.