scorecardresearch

अटकेच्या भीतीपोटी हेडगेवारांनी नेताजींची भेट नाकारल्याचा राऊतांचा आरोप, RSS चं प्रत्युत्तर, म्हणाले, “ओकलेली गरळ…”

सरसंघचालक हेडगेवारांनी अटकेच्या भीतीपोटी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारल्याच्या नितीन राऊत यांच्या आरोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रत्युत्तर दिलंय.

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सरसंघचालक हेडगेवारांनी अटकेच्या भीतीपोटी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारल्याचा आरोप केला. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) यावर प्रत्युत्तर दिलंय. राज्यातील सत्तारूढ मविआ सरकारचे सर्व आघाड्यांवरील अपयश झाकण्यासाठीच महाराष्ट्राचे अकार्यक्षम ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत सातत्याने बेताल वक्तव्ये करीत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील ऐतिहासिक भेटीबद्दल राऊत यांनी ओकलेली गरळ हे त्याचेच द्योतक आहे, असं मत आरएसएसने व्यक्त केलंय.

संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं, “नितीन राऊत यांचा आरोप हा नेताजी बोस व डॉ. हेडगेवार यांच्या ज्या भेटीच्या अनुषंगाने आहे. ती ऐतिहासिक भेट २० जून १९४० रोजी झाली होती. त्यावेळी डॉ. हेडगेवार हे अत्यवस्थ होते. त्यांच्यावर मेयो रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे ते नागपूर नगर संघचालक बाबासाहेब घटाटे यांच्या निवासस्थानी होते. नागपूर दौऱ्यावर आलेले नेताजी सुभाषचंद्र बोस २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता घटाटे यांच्या निवासस्थानी पोहोचले. अंगात बराच ताप असल्यामुळे त्यावेळी डॉ. हेडगेवार यांना झोप लागली होती.”

“हेडगेवार आजारी असल्याने नेताजींनी झोपेतून उठवण्यास नकार दिला”

“आपले काही काम असल्यास आम्ही डॉ. हेडगेवार यांना उठवतो असं स्वयंसेवकांनी सांगितलं. यावर नेताजींनी नकार देत डॉ. हेडगेवार आजारी असल्यामुळे आपण त्यांना भेटण्यास आल्याचे सांगितले. तसेच कामासाठी त्यांना पुन्हा भेटायला येऊ असं म्हटलं,” अशी माहिती संघाने दिली आहे.

संघाने पुढे सांगितलं, “दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जून १९४० रोजी डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले. नेताजी व हेडगेवार दोघांमधील आत्मीय संबंधांचा या प्रसंगावरून पुरेसा अंदाज येऊ शकतो. मात्र आपल्याच पक्ष संघटनेचे वरिष्ठ नेते राहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. हेडगेवार या दोन्ही महानुभावांबद्दल व इतरही स्वातंत्र्ययोद्ध्यांबद्दल राऊत यांचे अज्ञान व द्वेष त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येतो.”

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राऊत यांना फोबिया”

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राऊत यांना फोबिया असल्याचे त्यांच्या अनेक वक्तव्यांतून वारंवार दिसून आले आहे. संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रूग्णालयातून त्यांनी त्यावर इलाज करून घ्यावा. आपल्या सेवाभावी स्वभावानुसार संघ स्वयंसेवक राऊत यांच्या सुदृढ मानसिक आरोग्याची कामना करून, त्यांना योग्य ती मदत करतील, असा विश्वास आम्ही या निमित्ताने देतो,” असं संघाने म्हटलं.

संघाने हेडगेवार आणि गांधीजी यांच्याबाबतही माहिती दिले. ते म्हणाले, “वस्तुतः डॉ. हेडगेवार हे अत्यंत देशभक्त म्हणून नावाजलेले होते. आधी लोकमान्य टिळक आणि पुढे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीतील ते एक अग्रणी योद्धे होते. वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकाता येथील नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना डॉ. हेडगेवार यांचा संबंध अनुशीलन समिती या क्रांतीकारक संघटनेशी आला होता. ते या समितीचे प्रतिज्ञित कार्यकर्ते होते. पुढे महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरीत होऊन डॉ. हेडगेवार यांनी काही काळ विदर्भ काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही काम पाहिले.”

हेही वाचा : “अटकेच्या भीतीपोटी सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती”; नितीन राऊत यांचं वक्तव्य

“पुढे संघाची स्थापना केल्यावर देखील डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य चळवळीतील आपला सहभाग कायम ठेवला होता. २२ जुलै १९३० रोजी यवतमाळ येथे जंगल कायदेभंग सत्याग्रहात सहभागी झाल्याबद्दल डॉ. हेडगेवार यांना ९ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली होती. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी सरसंघचालक पदाचाही काहीकाळ त्याग केला होता. नितीन राऊत विदर्भात ज्या पक्षाचे काम करीत मोठे झाले, निदान त्यांनी त्याचा इतिहास नीट अभ्यासायला हवा होता,” असं संघाने म्हटलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rss answer allegations by nitin raut over dr hedgewar and subhash chandra bose meeting pbs

ताज्या बातम्या