मुंबई : जागतिक पातळीवर भारताची पत आता वाढली आहे. अशा वेळी आंतरराष्ट्रीय व्यवहार हा कोणाच्या दबावाखाली येऊन करू नये तसेच व्यापार करार हे भारताच्या मर्जीनुसार व्हावेत, असा सल्ला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी सरकारला दिला. भारताने महाशक्ती म्हणून नव्हे तर विश्वगुरूची भूमिका वठवावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘संघ प्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज’ या विषयावर भागवतांची दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील पहिले पुष्प गुंफताना भागवत यांनी संघाची स्थापना, त्याची वाटचाल, स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास उलगडून सांगतानाच मातृभाषेतून शिक्षण, हिंदुत्व, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा विविध विषयांचा दोन सत्रांमध्ये झालेल्या भाषणांमध्ये ऊहापोह केला. अमेरिका आणि युरोपीय महासंघाशी झालेल्या व्यापार करारांवरून विविध पातळ्यांवर चर्चा सुरू झाली आहे. भारताचा कसा लाभ झाला हा दावा सरकारकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी झालेल्या करारांचा थेट उल्लेख टाळत करार हे भारताच्या अटीनुसार व्हावेत, अशी अपेक्षा केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही व्यवहार हे अपरिहार्य असतात. पण अशा व्यवहारांमध्येही कोणाच्या दबावाखाली येऊ नये, असे खडे बोलही सुनावले.
अनेक विदेशी वस्तूंपेक्षा भारतीय वस्तू चांगल्या आहेत. पण आपण विदेशी वस्तूंचाच वापर करतो. विदेशी वस्तूंशिवाय आपले व्यवहार होऊ शकतात. आपल्या देशाचा रोजगार कसा वाढेल याचा विचार करून वस्तू खरेदी करण्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. त्यातून भारतीय उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल.
धर्मनिरपेक्षता हा शब्द चुकीचा
रा. स्व. संघाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल नाहक टीका केली जाते. पाकिस्तान आणि बांगलादेश ही दोन्ही मुस्लीम राष्ट्रे आहेत. भारताने सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली. आता भारताची तेव्हाची भूमिका चुकीची होती, अशी टीका केली जाते. उगाचच इतिहास उगाळण्यात आता अर्थ नाही. वसुधैव कुटुंबकम््ला आपण प्राधान्य दिले. भारताचा स्वभाव हा सनातन आहे. धर्मनिरपेक्षता हा चुकीचा शब्द असून त्याऐवजी पंथनिरपेक्षता हा शब्द हवा होता, अशी सडेतोड भूमिका त्यांनी मांडली. हिंदू हा विचार आहे. तो केवळ धर्म नाही. हिंदू धर्मातील जातीव्यवस्था नष्ट झाल्या पाहिजेत. मंदिर आणि स्मशानभूमीत सर्वांना प्रवेश मिळेल व पाण्याचा वापर करता तेव्हाच आपला उद्देश पूर्ण झाला हे ठामपणे म्हणता येईल, असे भागवत यांनी सांगितले.
काँग्रेसच्या चळवळीला यश
सारी ताकद असतानाही १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यात भारताचा पराभव झाला आणि भारत गुलाम झाला. त्यानंतर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या काळात चार वेगवेगळे विचार होते. त्यात एक विचार संघाचे आद्य संस्थापक हेगडेवार यांचाही होता. ॲलन ह्मूय यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही स्वातंत्र्यासाठी चळवळ उभारली होती. सुभाषचंद्र बोस यांची वेगळी चळवळ होती. काँग्रेसने उभारलेल्या चळवळीला यश आले, असा उल्लेख भागवत यांनी केला. स्वातंत्र्यलढा किंवा नेहरूच्या धोरणांना भाजपकडून काँग्रेसला दूषणे दिली जात असताना भागवतांनी व्यक्त केलेले मत महत्त्वाचे आहे.
मोदींचा पक्ष वेगळा
रा. स्व. संघाचे कार्य गेले शतकभर निरंतर सुरू आहे. त्यात खंड पडलेला नाही. संघाला कधीच सत्ता व प्रसिद्धीची हौस नव्हती व नाही. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असले तरी त्यांचा पक्ष हा भाजप आहे. भाजप व रा. स्व, संघ पूर्णपणे वेगवेगळे आहेत. मोदी संघाचे स्वयंसेवक असले तरी त्यांचा भाजप हा पक्ष वेगळा आहे. सरकारमध्ये काही स्वयंसेवक जरूर आहेत पण त्याचा अर्थ संघ सत्तेत आहे असे नाही, असे भागवत यांनी स्पष्ट केले. भाजपवर संघाचे नियंत्रण नाही हे त्यांनी अधोरेखित केले.

