मुंबई : पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे तसेच विदेशी भाषांचा वापर टाळावा, असे रोखठोक प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. भारतीय भाषांचा वापर कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत पालकांनी मुलाांशी घरी मातृभाशेतूच संभाषण करावे, असे आवाहन केले.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना भागवत यांनी मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार केला. मुंबईत मराठी – हिंदी भाषांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे, असे आग्रही मत मांडले.

मातृभाषेचा वापर सर्वत्र वाढला पाहिजे. ममी- डॅडी म्हणण्यापेक्षा मुलांनी आई – वडिल असेच म्हटले पाहिजे. इंग्रजीच्या वाढत्या वापराबद्दल चिंता व्यक्त करताना भागवत यांनी विदेशी भाषांचा वापर टाळावा, अशी भूमिका मांडली. विदेशी मानसिकतेतून बाहेर पडण्यावर त्यांनी भर दिला.

रा. स्व. संघाबद्दल नाहक गैरसमज पसरविला जातो. संघाला जाणून घ्यायचे असल्यास संघ शाखांचा अनुभव घ्यावा. संघाची शाखा, कार्यकर्ते, शिबिरे आदींचे स्मूक्ष निरीक्षण केल्यास संघ ययार्थ समजेल, असेही भागवत यांनी सांगितले. संघ कोणाच्या विरोधात नाही. कितीही आरोप, टीका झाली तरी संघाचे काम सतत सुरू असते.

संघाला सत्ता आणि प्रसिद्धीचा सोस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, संविधान आधारित नागरी कर्तव्यांचे पालन या पाच बिंदूंवर दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. संघकार्याच्या सध्याच्या मांडणीचा पंचपरिवर्तन हा कार्यक्रम प्रतिपादित केला.