प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाने अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याचं कळतं. काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केलेली त्याच पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. कालच भाजपाने या ठिकाणी जावेद अख्तर यांनी माफी मागावी यासाठी आंदोलन केलं होतं.

जुहूमधील इस्कॉन मंदिराजवळ असणाऱ्या अख्तर यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीय. या ठिकाणी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उजव्या विचारसरणीच्या जगभरातील संघटनांचे विचार हे सारखेच असतात असं मत अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य अख्तर यांनी केलं होतं.

नक्की वाचा >> “…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील, असे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केली आहे. अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. अख्तर यांचे वक्तव्य चुकीचे आहे, इतकेच नव्हे हा हिंदू समाजाचा अपमान आहे. हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करीत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानवर टीका करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर म्हणाले. जावेद अख्तर यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नक्की वाचा >> “हिंमत असेल तर जावेद अख्तर यांना…”; राम कदम यांचं शिवसेनेला खुलं आव्हान

चित्रपट प्रदर्शनावरुन इशारा

”जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य लाजीरवाणं आहे. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिदू परिषदेचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारं असून अपमानजनक आहे,” असं भाजपाचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे. “हे वक्तव्य करण्याआधी संघ परिवाशी संबध असलेल्या व्यक्ती या देशाचं नेतृत्व करत आहेत याचा तरी त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. जर तालिबानसारखी विचारसरणी असती तर आज तुम्ही अशा प्रकराचं वक्तव्य तरी करू शकले असते का?” असं म्हणत राम कदम यांनी जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय सेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागावी अन्यथा कुटुंबातील व्यक्तीचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा राम कदम यांनी दिलाय.

शिवसेनेनंही केली टीका…

शिवसेनेनेही या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असं म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचं असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलंय.

अख्तर काय म्हणाले?

तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘‘त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो, अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.’’