मुंबई: भारतीय जनता पक्षाची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याला अनेक वर्षे विरोध केला. ते तिरंग्याला अपशकुनी मानत होते, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा काहीही सहभाग नव्हता तसेच स्वातंत्र्यानंतर ५०-५५ वर्षे आरएसएसने तिरंगा झेंडा आपल्या कार्यालयावर फडकवलाही नाही, आज त्यांना तिरंग्याचे प्रेम वाटत असेल तर हे स्वागतार्हच आहे, ‘देर आये दुरुस्त आये’, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्यात आला तसेच राज्यातील राजकीय, सामाजिक व इतर महत्वाच्या प्रश्नांवर तसेच रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत एसआयवरही चर्चा करण्यात आली.
काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ६५ हजार बीएलए–२ नियुक्त केले आहेत तर बीएलए-१ सुद्धा नियुक्त केले आहेत. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. भाजपचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे, महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जातीपातीच्या व धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात आहे.
‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीप्रमाणे भाजपाचे काम सुरू आहे; परंतु भाजप महायुती सरकारचा हा डाव काँग्रेस हाणून पाडेल व जनतेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल, असे सपकाळ यांनी सांगितले. झारखंड मधील विद्यार्थी आंदोलनासंदर्भात भाजप खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले यावर बोलताना भाजपचे हे आंदोलन हास्यापद आहे. दिल्लीत जंतरमंतरवर व देशभर पेपरफुटीच्या प्रश्नावर तरुणांनी मोठे आंदोलन केले असता त्यांच्यावर अमानुष पद्धतीने लाठीहल्ला केला, पॅलेट गन चालवल्या गेल्या, शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, मुलींना अत्यंत वाईट वागणूक दिली, त्यावेळीच भाजपच्या खासदारांनी असे आंदोलन करायला हवे होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारंखडच्या विद्यार्थी आंदोलनावर केलेला लाठीहल्ला चुकीचाच आहे, असे स्पष्ट केले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
