मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रत्नाकर भागवत यांचे मुंबईतील प्रभादेवी येथील निवासस्थानी मंगळवारी रात्री निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, एक मुलगा, जावई असा परिवार आहे. रत्नाकर भागवत यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संघ कार्यात भरीव योगदान असलेल्या आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी दादर परिसरातील अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नाकर भागवत हे मूळचे महाडचे होते. बालपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. तेव्हापासूनच ते स्वयंसेवक या नात्याने संघ कार्याशी जोडले गेले. पुढे रिझर्व बँकेतील ५० वर्षे नोकरी सांभाळून त्यांनी संघ कार्यातही स्वतःला झोकून दिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. ते स्वतः उत्तम वक्ते होते. संघाची अनेक गीते त्यांना मुखोद्गत होती. वाचनाचाही त्यांना व्यासंग होता.

हेही वाचा…अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार

संघाचे स्वयंसेवक म्हणून हिरीरीने कार्य करणाऱ्या भागवत यांनी १९४८ च्या संघ बंदीत तुरुंगवासही भोगला होता. त्यांचे उत्तम वक्तृत्व, संघाची शिस्त आणि कार्यातील त्यांची धडाडी यामुळे संघाचे एक निष्ठावान स्वयंसेवक म्हणून त्यांची ख्याती होती. १९७८ च्या सुमारास भायखळा परिसरातील संघकार्याची धुरा त्यांनी नगर कार्यवाह पालक म्हणून सांभाळली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अशा अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे विद्यमान सभापती रवींद्र साठे हे त्यांचे जावई आहेत. रत्नाकर भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वयंसेवकाच्या निधनाने एक उत्तम मार्गदर्शक आपल्यातून निघून गेल्याची भावना संघाच्या स्वयंसेवकांकडून व्यक्त होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss veteran swayamsevak ratnakar bhagwat passed away at the age of 95 at his residence in prabhadevi mumbai print news sud 02